Home Maharashtra अजितदादांच्या निधनाने राज्याचे अपरिमित नुकसान – हर्षवर्धन पाटील…

अजितदादांच्या निधनाने राज्याचे अपरिमित नुकसान – हर्षवर्धन पाटील…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

               राज्याच्या राजकारणामध्ये गेली जवळपास 40 वर्षे अजितदादा हे नाव नेहमी अग्रभागी राहिले. संपूर्ण राज्या बरोबर पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अजितदादांच्या अचानक जाण्याने राज्याचे भरून न येणारे अपरिमित असे नुकसान झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

            छत्रपती कारखान्याच्या संचालक पदापासून राजकीय कारकीर्द सुरू केलेले अजितदादा हे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्याची माहिती असलेल्या ठराविक प्रमुख नेत्यांपैकी एक लोकप्रिय नेते होते. अजितदादांची जनतेशी, कार्यकर्त्यांशी नाळ जोडली गेली होती, त्यामुळे त्यांना मोठी लोकप्रिय लाभली. राज्यातील शेतकऱ्यांसह समाजामधील सर्वच घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग केला, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

           ते पुढे म्हणाले, गेली आठ दहा दिवसांपूर्वीच आमच्या भेटी झाल्या होत्या. तर राज्य मंत्रिमंडळामध्ये 15 वर्षे आंम्ही एकत्र काम केले. त्यांना राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक विषयाची सखोल अशी जाण होती. निर्णयक्षमता, प्रशासकीय अनुभव, जनतेच्या प्रश्नांचे ज्ञान यामुळे त्यांच्या कामाची तडफ राज्याने नेहमीच अनुभवली. तसेच अजितदादांनी अभ्यासू वृत्तीच्या जोरावर विधिमंडळामध्येही आपल्या कामाचा ठसा उमटवला. रोखठोकपणा बरोबरच दिलदार असा त्यांचा स्वभाव होता.

          अजितदादांच्या अचानकपणे आपलेतून निघून जाण्याने राज्यातील राजकीय, सामाजिक तसेच सर्वच क्षेत्रांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन होते, त्यामुळे राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या अनेक योजना साकारल्या गेल्या. साहजिकच, त्यामुळे काम करणारा माणूस अशी अजितदादांची लोकप्रिय प्रतिमा निर्माण झाली, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.