धर्म म्हणजे ” धारणा “. एखाद्या विचाराचा किंवा कल्पनेचा स्वीकार करणे, स्वीकार करणे म्हणजे ते अंगी बाळगणे आणि आचरणात उतरविणे, म्हणजे त्या विचाराची किंवा कल्पनेची अंमलबजावणी करणे, अमलात आणणे होय. परंतु त्याआधी म्हणजेच कोणताही विचार किंवा कल्पना स्वीकारण्याच्या आधी त्यावर विश्वास ठेवावा लागतो, विश्वास ठेवणे म्हणजे मान्यता देणे म्हणजे मान्य करणे होय. अशावेळी कल्पना ही संकल्पना बनते आणि संकल्पना हे तत्व बनते असे घडत असते.
कोणत्याही विचारावर किंवा संकल्पनेवर जेव्हा माणूस विश्वास ठेवतो म्हणजेच मान्यता देतो त्यावेळी तो विचारपूर्वक म्हणजे विचार करूनच विश्वास ठेवतो किंवा मान्यता देतो असे नाही, तर काही लोक विचारपूर्वक तर काही लोक विचार न करताच भावनेच्या भरात विश्वास ठेवतात, मान्यता देतात. अशावेळी भावनेच्या आधारे जे लोक विश्वास ठेवतात ते फसतात किंवा अज्ञानातच राहतात. मान्यता म्हणजे मानने होय जाणणे नव्हे, माननीय आणि जाणणे यात बराच फरक आहे. हा फरक समजून घेणे आवश्यक आहे. मानण्यात श्रद्धा असते आणि जाणण्यात डोळसपणा असतो.
मान्यता म्हणजे मानणे आणि माननीय म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धेला विवेक नसला की ती अंधश्रद्धा बनते, विवेक म्हणजे विचाराची तपासणी होय, चिकित्सा होय. ज्याचे चिकित्सा होत नाही त्याची काळानुसार प्रगती होत नाही किंवा त्यात बदल होत नाही. सारे धर्माचे असेच बंधन आहे की धर्माची चिकित्सा करू नये म्हणजे याचा अर्थ ” धर्म ” ही संकल्पना ताठर ( rijid ) आहे,” मोडेन पण वाकणार नाही ” या म्हणी प्रमाणे धर्माची चिकित्सा का करू नये ? तर त्याचे कारण म्हणजे धर्म आणि धर्मग्रंथ हे ईश्वराची निर्मिती आहे मानवनिर्मित नाही आणि ईश्वर म्हणजे स्वयंभू प्रणाली अजय अमर निर्गुण निराकार आहे. चिरंतन आहे. ( असे विचार एक तर अज्ञानातून किंवा कुटीरपणातून निर्माण झाले असावेत ). यावर विश्वास ठेवणे म्हणजेच मान्यता म्हणजेच श्रद्धा होय.
श्रद्धा म्हटले की तिथे बंधन आले, स्वतःने स्वतःवरच भीतीपोटी किंवा अज्ञानापोटी घालून घेतलेले बंधन होय. म्हणजेच अंधश्रद्धा होय. आणि विचारपूर्वक घालून घेतलेले बंधन म्हणजे ” डोळस श्रद्धा ” होय. डोळस श्रद्धांजली प्रवाही पाहिजे, वाहत्याधारेप्रमाणे तिचे वाहने बंद झाले तर डबके बनते. मग त्यात विचार पण कुजतात आणि सडतात. यामुळे माणूस अविचारी बनतो. स्थळ स्थळ काळ परिस्थिती यानुसार बदलत राहणे म्हणजे विचाराचे वाहतेपण होय. म्हणजेच विचार जिवंत राहणे असा त्याचा अर्थ होतो.
माणूस हा समाजशील समाजप्रिय आणि विचार करणारा प्राणी आहे, काळानुसार तो बदलत बदलतो. मेंदूतून विचार आणि कल्पना प्रसवतात त्यानुसार त्याचे वर्तन बदलते, बदलत्या वर्तनातून संस्कृती आणि सभ्यता निर्माण होते. या संस्कृतीचे रूपांतर तो धर्मात करतो. ज्यात सगळ्यांचे हित आहे म्हणजेच सकल जन हितकारी असे नियम बनून ” धर्म ” या संस्थेत माणूस बांधला जातो.
धर्म ही एक अलिखित अनौपचारिक संस्थाच आहे. संस्था म्हणजे ट्रस्ट, विश्वस्त संस्था, म्हणजेच एकमेकांनी एकमेकांवर विश्वास ठेवून काही ध्येय उद्दिष्टे अटी नियम कायदे पाळायचे असतात आणि ठरवून दिलेले कार्यक्रम करायचे असतात. यालाच संस्था असे म्हणतात. अशीच एक संस्था म्हणजेच धर्म होय. याचा अर्थ औपचारिक संस्था आणि अनौपचारिक धर्म हे सारखेच असतात
सर्वधर्माची तत्त्वे, तत्त्वज्ञान, मूल्य ही उदात्तच आहेत जसे की ख्रिश्चन धर्माचे तत्व हे ” प्रेम ” आहे. इस्लाम धर्माचे तत्व ” बंधुभाव ” हे आहे. शीख धर्म त्याग शिकवितो. जैन धर्माची शिकवण अहिंसा ही आहे. हिंदू धर्म हा प्राकृतिक धर्म आहे म्हणून तो निसर्ग पूजक आहे. तो कृतज्ञता आणि आदरभाव शिकवितो. बौद्ध हा धर्म जरी मांडला तरी तो स्वातंत्र्य समता न्याय हे तत्व सांगतो. सर्वधर्मात अपवाद म्हणून वैदिक धर्म आहे कारण त्याचे तत्व हे ” ईश्वर तत्व ” आहे. जे अभौतिक प्राकृतिक अनैसर्गिक आणि काल्पनिक आहे, म्हणजेच सत्यावर आधारित नाही.
प्रेम बंधुभाव दया अहिंसा समता स्वातंत्र्य त्या आदरभाव ही सूक्ष्म तत्वे असली तरी भौतिक आहेत याचा अर्थ ही तत्वे किंवा सिद्धांत किंवा मूल्य ही अतिसूक्ष्म आहेत म्हणजे संकल्पना आहेत म्हणजेच डोळ्याला दिसत नाहीत परंतु ती अनुभवता येतात. आचरणात आणता येतात. म्हणून ही तत्वे केवळ काल्पनिक नाहीत स्वप्न नाहीत तर भौतिक पण आहेत. वैदिक धर्माचे मात्र असे नाही, या धर्माचे विचार तत्त्वे मूल्य सारी काल्पनिक आहेत म्हणून मनोरंजक आहेत. हा धर्म म्हणजे शेख चिल्ली किंवा अल्नासकर च्या गोष्टीप्रमाणे स्वप्नातील जग आहे.
काल्पनिक वैदिक धर्म सोडून आणि वास्तविक बौद्ध धर्म वगळता बाकी सर्व धर्माची तत्वे किंवा मूल्य ही जरी इहवादी वास्तविक सत्य असली तरी या सर्वच धर्मांनी ” ईश्वर ” ही संकल्पना मान्य केली आहे, मान्यता आहे. यामुळे सर्व धर्म वास्तविक पण मान्यतेने ते आशीर्वादी असल्यामुळे काल्पनिक आहेत. तसे पाहिले तर सर्वच धर्माचे आचरण हे मिश्र स्वरूपाचे बनले आहे. यांचे आचरणात शुद्धता आणि अशुद्धता दोन्ही निदर्शनास येते. वैदिक धर्म वगळता बाकी सारे धर्म माणूस म्हणून माणसावर प्रेम करतात, माणसाला जवळ करतात, पशुपक्षावर पण दया करतात, कुणाचीही हिंसा करत नाहीत, परंतु माणसांपेक्षाही देव श्रेष्ठ मानून माणसाबरोबरच किंबहुना त्यापेक्षाही जास्त देवावर प्रेम करतात. माणसातीलच कुणालातरी गुरु म्हणून त्याची सेवा भक्ती करतात आई-वडिलास देव म्हणून त्यांची सेवा भक्ती करतात तरीपण देव श्रेष्ठ मानतात. देवाची ही शिकवण भारतात हिंदूंनी म्हणजेच सिंधू संस्कृती वाल्यांनी वैदिक धर्माकडून घेतलेली आहे. ( नव्हे लादल्या गेलेले आहे किंवा त्यांच्या घरी उतरविल्या गेलेली आहे.). म्हणून बहुजन असलेल्या हिंदूंना वैदिक धर्माची सवय झाली आहे. यामुळे माणसात देव पाहण्याची दृष्टी लोक पाहून दगडात आकाशात स्वर्गात देव आहे असे म्हणण्याची दृष्टीकोन निर्माण झाला आहे.
सर्व धर्माची तत्वे चांगलीच म्हणजेच सकलजन हितकारी असली तरी धर्माचे कर्म मात्र केवळ कर्मकांड आराधना आणि ऐतखाऊ लोकांचे पुजाऱ्यांचे भरण पोषण करणारे बनले आहे. धर्माचे कर्म म्हणजे पूजापाठ आराधना प्रार्थना तीर्थयात्रा नवस कौल लावणे अन्नदान पैसा सोने गाय दान करून बहुजन समाज स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेत आहे. बहुजन समाज गरीब असल्याचे देव आणि धर्म आणि धर्माचे कर्म हे एक कारण आहे. श्रमिक वर्गाने श्रम करावेत आणि देवधर्म चे कर्म म्हणून आपली संपत्ती खर्च करावी आणि कुटील कारस्थानी धर्माचे ठेकेदार आणि राजकर्ते या यांनी यांच्या श्रमावर म्हणजे यांची लूट करून यांची मिरवणूक करून श्रीमंत बनावेत अशी व्यवस्था निर्माण केल्या गेले आहे. खरे तर कोणत्याही धर्मात हे कर्मकांड नाहीच. केवळ दोन हस्तक आणि एक मस्तक, अनेक काही न पाहिजे देवा, आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी तीर्थ काशी पंढरपुरी, गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा, कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव दगडात नसून प्रत्येक जीव मात्राच्या आत्म्यात आहे, हीच खरी शिकवण आणि हेच खरे धर्माचे खरे कर्म होय. पण वैदिक धर्माच्या शिकवणुकीमुळे लोकांना याचा विसर पडला. धर्माचे खरे कर्म बाजूला पडले आणि खोटे दर्शनीक दिखाओ नावलौकिकाचे कर्म व्यवहारात आले. कूटनीतीच्या शोषक आणि शासक आहेत खाऊ लोकांनी जनतेला या खोट्या कर्माची सवय लावली, केवळ त्यांच्या स्वार्थापायी.
खरे पाहू जाता सारे धर्म हे कल्पनेवर आधारित आहेत, ईश्वर मुख्य वैकुंठ विमान चमत्कार स्वर्ग मृत्यू पाताळ, सैतान राक्षस भूत हडळ , देव आणि दैव, भगवान आणि भाग्य, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून लोकांना परावलंबी बनविणे म्हणजेच ईश्वरावर किंवा एखाद्या महाराजांवर अवलंबून ठेवणे, पाप पुण्य आणि पुनर्जन्म, मागच्या जन्मी केलेले कर्म त्यानुसार या जन्मात भोग भोगावे लागतात ही शिकवण, जीवात्मा मृतात्मा भूत प्रेत हडळ, देव देव देवीचा कोप किंवा कृपा, दुष्काळ पूर वीज पडणे भूकंप होणे हे सार अतिपाप झाल्यामुळे घडते अशी लोकांची धारणा, पिंडीला कावळा शिवने, तेरवी करणे, देवापुढे चप्पी करणे, इत्यादी अशा कितीतरी रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा आहेत ज्यात काहीच सत्यता नसून केवळ या सर्व गोष्टी कल्पनेवर आधारित आहेत. या सर्व खुळ्या कल्पना धर्मामुळेच निर्माण झालेले आहेत. धर्म नाहीसा झाला तरच या सर्व खुळ्या खोट्या काल्पनिक कर्म कांडाच्या गोष्टी घडणार नाहीत, आणि धर्माच्या नावाने होणारे शोषण पिळवणूक बंद होईल.
आता असा प्रश्न निर्माण होईल की, जर धर्म नष्ट झाले तर प्रेम बंधुभाव आदर अहिंसा त्याग इत्यादी धर्मांच्या मूल्यांचे काय ? याचे उत्तर असे की, याला पर्याय भारतीय संविधान आहे. जे मानवी मूल्यांची जपवणूक करते. भारतीय संविधान म्हणजेच राष्ट्रधर्म होय अशी मान्यता मिळाली की मग धर्मा वाचून काहीच अडणार नाही. कल्पनेच्या आणि खोट्या जगात वावरण्यापेक्षा वास्तव जीवन जगणे हेच विचारशील माणसाचे लक्षण होय.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक: 26 जुलै 2025. फोन: 94 20 91 22 09.


