साहेब, गुंडप्रवृत्ती वाल्यांना तडीपार… मग अवैध दारुविक्रेत्याचं काय?

प्रितम जनबंधु

संपादक

             गडचिरोली जिल्ह्यात गणेशोत्सव १९ ते २९ सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गुंडप्रवृत्तीच्या ५३ लोकांना तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले आहेत.

            गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या दारूविक्री तसेच अन्य अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिस दलाद्वारे निरंतर प्रयत्न केले जात असले तरी आरमोरी शहरात राजरोसपणे दिवसाढवळ्या अवैधदारु विक्री होतांना दिसुन येत आहे.यावर स्थानीक प्रशासन कारवाई का करत नाही? केवळ चिल्लर विक्रेत्यांवरच थातूरमातूर व केविलवाण्या कारवाया का करतात? दारुमाफीयावर कारवाई का होत नाही. याला मुख्यत्वे करुन जबाबदार कोण? असे अनेक गहन प्रश्न जनसामान्यांची झोप उडवीत आहेत.

             यावर जिल्हा प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष केंद्रित करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी तद्वतच दारुविक्रेत्यावर कारवाई करुन जेरबंद करण्यात यावे अशी आरमोरी वाशियाची मागणी जोर धरू लागली आहे.

         सण, उत्सवाच्या काळात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सर्व पोलिस ठाणे, उपपोस्टे व पोमकेला दिले असले तरी सदर आदेशाचे पालन आरमोरी शहरात होत असल्याचे दिसुन येत नाही. ही एक खेदाची बाब प्रकर्षाने जाणवत आहे.

          सद्यस्थितीत जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी गणेश मंडळाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.यादरम्यान,अनुचित घटना घडू नये,शातता व सुव्यवस्था राखली जावी याकरिता गुडप्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करण्यात आले असले तरी स्थानीक भागात अवैध दारु विक्री करणारे दारुचे ठेकेदार मात्र अद्यापही मोकाटपणे वावरतांना दिसत आहेत व दारुविक्री अगदीच जोमात सुरु असल्याने शहरातील शांतता व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतांना दिसत आहेत.

         संबधीत स्थानीक पोलीस प्रशासन मात्र चिल्लर विक्रेत्यांवर केविलवाण्या कारवाया करत असुन मद्द सम्राटाना मात्र मोकळीक देत आहे की काय? असा सवाल आरमोरीकराच्या मनात घर करु लागला आहे.

          सर्वात जास्त अशांतता दारु व्यवसायामुळे होत असल्याने अवैधरित्या दारू विक्री करणेवाल्यांवर सुद्धा तडीपारची कारवाई होणे क्रमप्राप्त आहे.तद्वतच समाज हितोपयोगासाठी त्यांचेवर कायदेशीर लगाम लावणे हाच एक उपाय आहे.