पाण्याचा प्रत्येक थेंब अडविल्या शिवाय पाणी प्रश्न सुटणार नाही :- तुकाराम मुंडे — महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती ,समस्या आणि उपाय’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

पुणे : ‘पाण्याचा ताळमेळ, किंमत आणि गुणवत्ता याबाबत शासन आणि नागरीक स्तरावर विचार झाले पाहिजेत. उपलब्ध पाणी, त्याचा खरा उपयोग, नासाडी याचा ताळमेळ लावला पाहिजे. ‘वॉटर अकाउंट’ झाले पाहिजे. पाण्याबाबत भयावह चित्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी महिन्यातून दोनदाच पाणी मिळते. ही विसंगती दूर करावी लागेल. जनजागृती, जल साक्षरता वाढली पाहिजे. १९९० पूर्वी टँकर नव्हते, आता बारा महिने टँकर लागतात. अनेक योजनांची नीट अंमलबजावणी होते का हे तपासले पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविल्या शिवाय पाणी प्रश्न सुटणार नाही. असे प्रतिपादन पशुसंवर्धन विभागाचे विभाग सचिव तुकाराम मुंडे यांनी केले.

          ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या संस्थेतर्फे आयोजित महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती, समस्या आणि उपाय’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन रविवारी सकाळी पशुसंवर्धन विभागाचे विभाग सचिव तुकाराम मुंडे, माजी कुलगुरु डॉ.अरुण जामकर, जलसंपदा विभागाचे माजी सचिव डॉ.दि.मा.मोरे, ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ चे अध्यक्ष शशिकांत पाटील, पुण्याचे आयकर आयुक्त संग्राम गायकवाड, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झाले.  

         डॉ.अरूण जामकर म्हणाले, ‘सुरक्षित पाणी हा महत्वाचा विषय आहे. अनेक रोगांना दूषित पाण्यामुळे निमंत्रण मिळते.आपण बाटलीतील पाणी विकत घेवुन पितो कारण, इतर पाणी आपल्याला सुरक्षित वाटत नाही. पाण्याबाबत सर्वंकष विचार करण्यासाठी पाण्यावर, पाण्याशी संबंधित विषयांवर संशोधन करण्यासाठी एक विद्यापीठ काढण्याची गरज आहे. आर ओ फिल्टर मुळे क्षार, कॅल्शियम वगळले जाते. त्यामुळे हाडांची हानी होते. पाण्याची नासाडी होते. आर ओ फिल्टर चा वापर कमी करण्याची गरज आहे’.

        पोपटराव पवार म्हणाले, ‘पाणलोट क्षेत्र विकास क्षेत्रात सकारात्मक विचार केला पाहिजे. प्लॅस्टिक आच्छादन चे शेत तळे हे मोठे संकट ठरणार आहे .पार्टी फंड, निवडणुकांचा वाढता खर्च पाहता टेंडर आधारित विकासावर विसंबून चालणार नाही. ग्राम राज्य आल्याशिवाय राम राज्य येणार नाही.