Home Maharashtra मोझरी पॉईंट परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेहामुळे खळबळ… — मृतदेह कुजलेले..

मोझरी पॉईंट परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेहामुळे खळबळ… — मृतदेह कुजलेले..

  अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

         दखल न्युज भारत

चिखलदरा :– पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा येथील मोझरी पॉईंट परिसरात रविवारी दुपारी एक सडलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडाला लटकलेला आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.ही घटना दुपारी अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

        सूत्रांमार्फत चिखलदरा पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.तेथे पोहोचल्यावर पोलिसांनी पाहिले असता मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत होता,ज्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले होते.

         मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असावे, अशी माहिती समोर आली आहे. त्याने काळ्या रंगाची पॅंट व क्रीम रंगाचा शर्ट परिधान केला होता.

      प्राथमिक तपासणीनुसार डॉक्टरांनी सांगितले की, मृतदेह सुमारे १० ते १२ दिवसांपूर्वीचा असू शकतो. मृतदेहाची स्थिती अत्यंत सडलेली असल्यामुळे ओळख पटवणे अशक्य झाले आहे.

      ही आत्महत्या,हत्या की अपघात याचा शोध घेण्यासाठी चिखलदरा पोलिस सर्व शक्यतेचा तपास करत आहेत. घटनास्थळी डॉक्टरांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

      या तपासात चिखलदरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत मसराम,पो.ह.अमोल शेंडे,शैलेश बेदरकर व चालक अनिल कापडे हे घटनास्थळी उपस्थित होते व तपास सुरू आहे.

      सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.चिखलदरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणी आपला सुमारे ४० वर्षे वयाचा नातेवाईक हरवल्याची तक्रार केली असेल किंवा अशी कोणतीही माहिती असेल,तर त्यांनी चिखलदरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

       ही घटना अत्यंत रहस्यमय असून संपूर्ण परिसरात भीतीचे व चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.