कोणत्याही परिस्थितीत मी पुणे लोकसभा निवडणूक लढवणारच :- वसंत मोरे…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर याना उमेदवारी दिली आहे. मात्र याच जागेसाठी मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे (Vasant More) सुद्धा आग्रही होते.

              पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या. परंतु आता काँग्रेसने रवींद्र धंगेकर याना मैदानात उतरवल्यानंतर वसंत मोरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मी अपक्ष अर्ज भरणार आहे, पण कोणत्याही परिस्थितीत मी पुणे लोकसभा निवडणूक लढवणारच अशी गर्जना वसंत मोरे यांनी केली आहे.

               एका वृत्तवाहिनीशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, महाविकास आघाडीकडे मी उमेदवारी मागायला गेलो नव्हतो, तर पुण्यात कशा प्रकारे तुम्ही समीकरणे जमू शकता याचा विचार करा हे मी सांगत होतो. पण पुण्यातील मनसेच्या नेत्याने पुन्हा एकदा माझ्या वाट्यात काटे टाकले. कोणी कुठे आणि कोणासोबत बैठका घेतल्या हे मी नंतर सांगणार आहे. पण मनसेत होतो तरी मला त्रास दिला आणि आता मनसे सोडली तरीही मला त्रास देण्याचं काम सुरूच आहे असं वसंत मोरे (Vasant More) यांनी म्हंटल. पण मी आजही निवडणूक लढवण्यात ठाम आहे, मी अपक्ष अर्ज भरणार आहे असं म्हणत वसंत मोरेंनी आपण लढणारच असल्याची घोषणा केली.

               पुणे लोकसभा निवडणुकीत मीच एक नंबरला राहील, पुणेकरांचा उमेदवार वसंत मोरे हाच असेल. वर्षभरापूर्वी जेव्हा गिरीश बापट यांचे निधन झालं तेव्हाच पुणेकरांनी ठरवलं आहे कि पुढचा खासदार वसंत मोरे हाच असेल, म्हणून मी पक्ष, संघटना या सर्व गोष्टीना तिलांजली वाहिली आहे. संपूर्ण पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास सुद्धा वसंत मोरे यांनी व्यक्त केला. वंसत मोरे यांच्या या भूमिकेनंतर पुण्यात रवींद्र धंगेकर vs मुरलीधर मोहोळ vs वसंत मोरे असा तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीत उडी घेतल्यानंतर त्याचा फायदा नेमका कोणाला होईल ते निकालानंतरच समजेल.