शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या तालुक्यातून असाच एक भन्नाट आणि मजेशीर ट्रेंड समोर आला आहे,ज्याने अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे.तालुक्यातील कल्पक युवकांनी मिळून सुरू केलेल्या ‘कोकरोच जनता पार्टी’ (KJP) या काल्पनिक पक्षाला नेटीझन्सनी डोक्यावर घेतले असून,अवघ्या काही दिवसांतच या पेजने तब्बल १०.९ मिलियन (१ कोटी ९ लाख) फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणाला आणि नेहमीच्या गंभीर चर्चांना बाजूला सारत,तरुणांनी निव्वळ मनोरंजनाच्या आणि उपरोधिक (Satirical) हेतूने ‘कोकरोच जनता पार्टी’ची स्थापना सोशल मीडियावर केली.राजकीय पक्षांच्या प्रचाराची शैली,त्यांच्या घोषणा आणि डिजिटल पोस्ट्सची नक्कल करत या पक्षाचे पोस्टर्स आणि रील्स बनवले गेले. “घरात आमचा दरारा,कचराकुंडीत आमचा निवारा!” अशा मजेशीर घोषणांनी नेटीझन्सना पोट धरून हसायला लावले.तालुक्यातील तरुणांनी या पक्षाचे ‘कार्यकर्ते’ म्हणून स्वतःला घोषित करत सोशल मीडियावर जोरदार पोस्टिंग आणि शेअरिंग सुरू केले.
कोणी विचारही केला नव्हता की, एक गमतीशीर आयडिया इतकी मोठी क्रांती करेल.युवकांच्या या कल्पकतेला संपूर्ण राज्यातून आणि देशातून दाद मिळाली. बघता बघता अवघ्या काही दिवसांतच फॉलोअर्सचा आकडा थेट १०.९ मिलियनवर पोहोचला. मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींच्या आणि खऱ्याखुऱ्या राजकीय नेत्यांच्या पेजेसनाही मागे टाकेल अशी घौडदौड या पेजने केली आहे.
ट्रेंडमुळे सध्या डिजिटल विश्वात हे नाव चांगलंच ट्रेंडिंगमध्ये आले आहे.गंभीर वातावरणात निखळ आनंद आणि हसू निर्माण करण्याच्या तरुणांच्या या टॅलेंटचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘कोकरोच जनता पार्टी’चे हे डिजिटल वादळ आणखी कुठेपर्यंत पोहोचते,याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.



