Home Social संगीता ठलाल यांच्या “झाडीचा खाजा” काव्यसंग्रहाचे प्रकाशन, कविसंमेलन व सत्कार समारंभ थाटात…...

संगीता ठलाल यांच्या “झाडीचा खाजा” काव्यसंग्रहाचे प्रकाशन, कविसंमेलन व सत्कार समारंभ थाटात… — झाडीबोली भाषा समृद्ध झाली पाहिजे :- सामाजीक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम यांचे प्रतिपादन…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांच्या “झाडीचा खाजा”, झाडीबोली काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे व सोबतच कविसंमेलनाचे तसेच नावाजलेल्या मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गट ग्रामपंचायत महादेवगड अरततोंडी च्या सभागृहात करण्यात आले होते.

        या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नाट्यलेखक /दिग्दर्शक सदानंद बोरकर होते,अध्यक्ष आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम होत्या,शुभहस्ते पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, भाष्यकार डॉ.धनराज खानोलकर, प्रा.राजकुमार मुसणे, विशेष अतिथी प्रा.भाऊराव पत्रे, अमृत ठलाल, मिनाक्षी सेडमाके, गीता लोहंबरे यांचे उपस्थितीत झाले.

        तसेच दुसऱ्या सत्राचे(कवी सम्मेलन) कविसंमेलनाध्यक्ष जेष्ठ हास्य कवी एकनाथ बुध्दे होते. गावखेड्यातील रितिरीवाजाप्रमाणे मान्यवरांचे पाय धुण्यात आले, लगेच महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.खरमतटोला येथील विद्यार्थीनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले.

        नैसर्गिक बहाव्याचे पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. सोबतच सदानंद बोरकर, राजकुमार मुसणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आले. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत झाडीचा खाजा” या झाडीबोली काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन झाले. 

         भाष्यकार डॉ.धनराज खानोलकर आणि प्रा. राजकुमार मुसणे यांनी “झाडीचा खाजा” या पुस्तकात अर्थपूर्ण लिहिलेल्या संगीता ठलाल यांच्या “रोवना आणि बोतरी” कवितांवर भाष्य करताना म्हणाले की, बोलीभाषेत कविता कशा असाव्या संगीता ठलाल यांच्या लेखणीतून दिसते म्हणूनच बोलीभाषेवर प्रेम करणाऱ्या या लेखिकेची भारत सरकारच्या साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने आमंत्रण येणे, राष्ट्रीय चॅनल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर, रेडीओ आकाशवाणी केंद्र नागपूर येथे त्यांची मुलाखत होणे या झाडीपट्टीचा मान आहे.

        संगीता ठलाल ग्रामीण भागातील ही कवयित्री आलेल्या अनुभवांवर लिहित असते. उद्घाटक म्हणून बोलताना डॉ.सदानंद बोरकर म्हणाले की, झाडीबोली भाषा जिवंत ठेवण्याचे काम संगीता ठलाल करत आहे. आपली मायबोली ही आपली माय आहे काल्पनिक लिखाण, न करता दैनंदिन अनुभव संगीता ठलाल लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर व्यक्त होत असते.झाडीपट्टीतील दुसरी बहिणाबाई आहे. तर पद्मश्री डॉ परशुराम खुणे यांनी सुद्धा संगीता ठलाल यांच्या विषयी बोलताना म्हणाले की, संघर्षातून घडलेली ही झाडीची लेक संगीता संस्कृती जपते, तशीच जगते,सामाजिक उपक्रम राबवते,हा झाडीचा खाजा हा काव्यसंग्रह येणाऱ्या भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल झाडीपट्टीतील संगीता ठलाल दुसरी बहिणाबाई आहे आणि तीच दुसरी बहिणाबाई होईल भाऊराव पत्रे यांनी सुद्धा आपले मनोगत संगीता ठलाल प्रति व्यक्त केले.

        अध्यक्षीय भाषणातून बोलताना कुसुमताई अलाम म्हणाल्या की, झाडीबोली भाषा समृद्ध झाली पाहिजे. जसे की संगीता ठलाल या जंगलातील रानमेवा रान औषध सर्व शोधून काढली.रानभाज्यांच्या जगात संशोधन ग्रंथ लिहून समाजप्रबोधन केले आहे. तसेच हा झाडीचा खाजा” नुसता झाडीबोली काव्यसंग्रह नसून वेदना, संघर्ष, तळमळ, आपुलकी, मेहनत, त्याग,श्रध्दा,आत्मविश्वासाचा ठेवा आहे ग्रामीण भागातील वास्तव जीवन कसे असते या झाडीबोली भाषेतून कविता लिहून संगीता ठलाल यांनी मायबोली समृद्ध होण्यासाठी पाऊल उचलले आहे. सोबतच पोलीस भरतीत नव्याने भरती झालेल्या सुरज दखणे यांचा पुष्पगुच्छ, शाल,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले, आरोग्य विभागात सेवानिवृत्त झालेले प्रकाश मेश्राम, कुसुम मुंगणकर ,एकनाथ बुध्दे ,बचत गटातील महिलांचा, स्वागत गीत गाणाऱ्या विद्यार्थींना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. दुसऱ्या सत्रात जेष्ठ कवी यांच्या उपस्थितीत कविसंमेलन घेण्यात आले, प्रमुख पाहुणे नंदकिशोर नैताम, रमेश कोरचा, शिल्पा पाटील, विश्वंभर गहाणे उपस्थित होते.

         गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्येने कवी व रसिक उपस्थित होते. सर्व कविंना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोबतच संगीता ठलाल यांनी गट ग्रामपंचायत अरततोंडी सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. शेवटी ग्रामीण भागातील रिवाजाप्रमाणे जेवणाचे तसेच नास्याचे आयोजन करण्यात आले होते.

        विशेष सहकार्य रुजेश्वर गहाणे, ईश्वर ठाकरे, वासुदेव लोहंबरे यांनी केले. आयोजन आणि प्रास्ताविक संगीता संतोष ठलाल यांनी केले तर सुत्रसंचालन पहिल्या सत्राचे मुरलीधर कवाडकर यांनी केले,कविसंमेलनाचे सुत्रसंचालन अमोल मेश्राम यांनी केले आभार राकेश खुणे यांनी मानले.