जिल्हा काँग्रेस कमिटीचा मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला घेराव… — 15 दिवसाच्या अल्टीमेटमसह विवीध मागण्यांबाबत निवेदन सादर…

प्रितम जनबंधु

   संपादक 

           गडचिरोली:- जिल्ह्यातील अनेक भागात मागील एक वर्षांपासून जंगली हत्तीचे आगमन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आणि नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस जंगली हत्ती आणि वाघाच्या हल्यात अनेक नागरिकांना जीवही गमावावा लागत आहे. आता काही ठिकाणी धानपीक लोंब टाकत आहेत तर काही ठिकानचे धानपीक कापणीवर आले आहेत. अशातच रानटी हत्तीचा आणि नरभक्षक वाघाचा अवाजवी हैदोस वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हातात आलेले पिक नासधुस होत आहेत तर वाघाची दहशत असल्याने पिकाची कापणी वेळेवर करने धोक्याचे व अवघड झाले असल्याने शेतीची कामे करायची तरी कशी असे अनेक प्रश्न शेतकर्‍यांना पडले आहेत.

 रानटी हत्ती आणि नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, आतापर्यंत हत्ती, वाघासह जंगली प्राण्याने ज्या शेतकर्‍याचे नुकसान केले त्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मयत झालेल्या मृताच्या परिवारास आर्थिक मदत करण्यात यावी, नुकसान भरपाई देत असताना जाचक असलेल्या अटींमध्ये शिथिलथा देण्यात यावी, गडचिरोली वनवृत्तात वन्यजीव विभागाची निर्मिती करण्यात यावी या मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात मुख्य वनसरक्षक कार्यालयाला घेराव करून आंदोलन करण्यात आले. 

         मुख्य वनसंरक्षकांना भेटून 15 दिवसाच्या अल्टीमेटमसह निवेदन देण्यात आले. 15 दिवसाच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास वनमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी म्हटले आहे.

            यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्‍वजीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कविता मोहरकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस अध्यक्ष लोरेन्स गेडाम, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, रुपेश टिकले, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, दत्तात्रय खरवडे, नेताजी गावतुरे, प्रभाकर वासेकर, कविता भगत, प्रभाकर कुबडे, तेजस मडावी, पुष्पलता कुमरे, जितेंद्र मुनघाटे, ढिवरू मेश्राम यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.