Home Maharashtra महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती कल्याण समितीचा आळंदी दौरा…

महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती कल्याण समितीचा आळंदी दौरा…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती कल्याण समितीच्या वतीने आळंदी नगरपरिषदेच्या विकासकामांची पाहणी करण्यात आली. समितीचे अध्यक्ष आ.नारायण कुचे, सदस्य आ.अमोल मिटकरी, आ.भीमराव केराम, आ.गजानन लवटे, आ. संजय नलावडे, आ.तान्हाजी मुटकुळे, सहसचिव नलावडे तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत नगरपरिषद क्षेत्रातील विविध प्रलंबित व सुरू असलेली विकासकामे तपासण्यात आली.

          यावेळी समितीने संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेतले यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांचा सन्मान व स्वागत केले. यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, संजय घुंडरे, अशोकराव उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, आकाश जोशी, अनिल वाघमारे, ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.

           या पाहणीदरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, तसेच नागरिकांसाठी सुरू असलेल्या मूलभूत सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आळंदीच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन विकासकामांची गरज अधोरेखित केली. समितीने नागरिकांकडूनही सूचना व अडचणी जाणून घेतल्या.

           यावेळी आळंदी येथील अनुसूचित जाती-जमाती घटकातील नागरिकांच्या घरकुल समस्येचा आढावा घेऊन त्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना समितीचे अध्यक्ष कुचे यांनी दिल्या. या संदर्भात माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी समितीसमोर घरकुल योजनेसंबंधी अडचणी मांडून न्याय देण्याची मागणी केली होती.

          आळंदी ही भाविकनगरी असल्याने येथे स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या सुविधा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे समिती सदस्यांनी नमूद केले. विकासकामांच्या गुणवत्तेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

          नगरपरिषद प्रशासनाने समितीसमोर चालू कामांचा अहवाल सादर करताना येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिली. समितीच्या या पाहणीमुळे आळंदीतील विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.