माणूस म्हटला की, सद्गुण आणि दुर्गुण या दोन्ही गोष्टींचा त्यात समावेश असतो. सद्गुण म्हणजे प्रेम ममता आदर सत्य न्याय नीती दया क्षमा शांती नम्रता इत्यादी अजून काही, आणि दुर्गुण म्हणजे क्रोध मान माया लोग द्वेष कपट अहंकार इत्यादी अजून काही. सद्गुण आणि दुर्गुण या दोन्ही गोष्टी प्रत्येक माणसात असल्या तरी काही लोकांना सद्गुनी माणूस तर काहींना दुर्गुणी माणूस असे म्हणतात, याचे कारण म्हणजे ज्याच्यामध्ये सद्गुणाचा प्रभाव जास्त आहे किंवा जो सद्गुणी वर्तन करतो त्यास सज्जन व्यक्ती असे म्हणतात आणि ज्या व्यक्तीमध्ये दुर्गुणांचा प्रभाव जास्त असतो आणि तो दुर्गुणी वर्तन करतो त्यास दुर्जन व्यक्ती असे म्हणतात. आदर्श हा सज्जनांचाच घ्यावा दुर्गुणांचा तिरस्कार करावा असा उपदेश संत महात्मे करतात. सज्जन व्यक्तींचा आदर्श घ्यावा अशी जरी असले, तरी शेवटी तो व्यक्तीच असल्यामुळे त्यात दुर्गुणही असतातच, परंतु सज्जन व्यक्ती सदगुणांचा वापर व्यवहारामध्ये जास्त करतो आणि दुर्गुणाचा वापर कमी करतो हेही तितकेच खरे आहे.
माणसाचे आदर्श कोण आहेत? तर देव संत महात्मे महामानव आणि सज्जन व्यक्ती हे माणसाचे ” आदर्श ” आहेत. परंतु यांना तरी आदर्श कसे मानावे ? कारण यांचे मध्ये सुद्धा दुर्गुण असतातच उदा. देव हा पुण्य करणाऱ्या माणसाचे भले करतो आणि पाप करणाऱ्या माणसांचा भले करत नाही म्हणजे त्याचे वाईट करतो, आणि कधी कधी तर भूकंप चक्रीवादळ महामारी अशा गोष्टी करून सज्जन आणि दुर्जन सर्वांचाच नाश करून टाकतो, असे असताना देवाला तरी निर्दोष कसे मानायचे ? आणि त्यास दोशी म्हटले तर, तो आदर्श कसा होऊ शकतो?
महात्म्यांना जर आदर्श मानायचे असे ठरले तर, महात्मे म्हणजे महान आत्मे, याचा अर्थ शुद्ध आत्मे, असा अर्थ जर घेतला तर त्यांचे आत्मे तरी कसे शुद्ध राहू शकतील ? कारण महात्मे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते पण माणूसच आहेत, आणि ते जर माणूस असतील तर मॅन इज द बंडल ऑफ मिस्टेक्स, म्हणजे माणूस हा चुकीचा पुतळा आहे, हे सर्व मान्य आहे, याचा अर्थ प्रत्येक माणसात सद्गुण आणि दुर्गुण, गुण आणि दोष हे समाविष्ट असतातच. कारण माणूस हा निसर्गाची उत्पत्ती आहे, आणि निसर्गाचा गुणधर्म पित्त वात आणि कफ या त्रिदोषाचा आहे, अर्थात कोणी पित्त प्रकृतीचा, कुणी वात प्रकृतीचा तर कोणी कफ प्रकृतीचा माणूस असतो आणि त्यानुसार त्याचे वर्तन होत असते, जसे की पित्त म्हणजे अग्नी आणि अग्नी म्हणजे क्रोध म्हणून पित्त प्रकृतीचा माणूस क्रोधी असतो, म्हणजे थंडी आणि म्हणून कफ प्रकृतीचा माणूस थंड असतो म्हणजे शांत असतो तर वात म्हणजे हवा वात प्रकृतीचा माणूस शांती आणि अशांती या दोन्हीचे मिक्स्चर असते. अग्नी हवा पाणी या तीन निसर्गाच्या एलिमेंट्स नुसार पृथ्वी पण उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतुणे तयार झालेले आहे आणि या तीन ऋतू नुसार माणसाची प्रकृती बनलेली आहे, आणि प्रकृतीनुसार माणूस बनलेला आहे, याचा अर्थ प्रत्येक माणसात वात पित्त कफ हे त्रिदोष आहेत तरी परंतु ज्या व्यक्तीत ज्याचे प्रमाण जास्त त्यानुसार क्रोधी शांत किंवा समतोल अशा स्वभावाची माणसे तयार झालेले आहेत, याचा अर्थ माणूस हा दोषपूर्ण आहे, तरी परंतु संस्काराने माणसांचा स्वभाव बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न माणूस करत असतो, यामुळे देव देवता महात्मे महामानव इत्यादी माणसांचे जे आदर्श आहेत ते सुद्धा दोषपूर्ण असल्यामुळे माणसाचे आदर्श होऊ शकत नाहीत, कारण आदर्श म्हणजे ” सदगुणांचा पुतळा, bunch of virtues “. आणि माणूस म्हणजे दुर्गुणांचा पुतळा. अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा मग नेमके ” आदर्श ” कशास म्हणावे किंवा मानावे ? हा प्रश्न बुद्धीला पडतो.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी माणसाची तुलना जनावराशी करावी लागेल, याचा अर्थ माणूस आणि जनावर सारखेच आहेत असे म्हणणे नव्हे तर, आधी माणूस हा प्राणी आहे आणि प्राण्यापासूनच त्याची उत्क्रांती होऊन म्हणजेच त्याच्या बुद्धीची उत्क्रांती होऊन तो माणूस बनला, तसेच त्याच्या शरीराची उत्क्रांती होऊन पण तो माणूस बनला, याचा अर्थ माणूस हा प्राण्यापासून बनलेला आहे म्हणजेच माकडापासून बनलेला आहे असे डार्विन हा वंश शास्त्रज्ञ म्हणतो.
जनावरातही बुद्धी असते आणि माणसातही बुद्धी असते परंतु जनावराची बुद्धी मर्यादित असते पण माणसाच्या बुद्धीला मर्यादा नाही, याचा अर्थ माणूस हा कितीही आणि काहीही आणि कसाही विचार करू शकतो, अर्थात किती विचार करावा ? कसा विचार करावा ? आणि कोणता विचार करावा ? याचे तारतम्य म्हणजेच विवेक बुद्धी पण माणसाकडे असते, आणि ज्याच्याकडे नाही त्यास ती तयार करता येते, वाचन केल्याने, जग पाहिल्याने, पंचंद्रियाच्या अनुभवाने माणसाची बुद्धी तल्लक होते किंवा त्यात प्रगती होते त्यातूनच चांगले काय वाईट काय, योग्य काय अयोग्य काय, चूक काय किंवा बरोबर काय हे त्यास या विवेक बुद्धीमुळे कळायला लागते, यातूनच म्हणजेच विवेक बुद्धीमुळे माणसाला सम्यक बुद्धी निर्माण करता येते, हे जनावरापेक्षा माणसाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. सम्यक बुद्धी ही ज्ञानार्जनाने आणि संस्काराने तयार होत असते, मानवी संरक्षण आणि शांतता आणि प्रगती यासाठी वापरण्यात येणारी बुद्धी ही प्रगतीशील बुद्धी असते, यातूनच विज्ञान आणि नैतिकता या गोष्टी शिकायचे असतात, हे एकदा माणसाला कळाले की मग माणूस आदर्शाच्या वाटेने जायला सुरुवात करत असतो. अर्थात प्रगती आणि नैतिकता ही स्थळ काळ परिस्थिती यानुसार भिन्न भिन्न असते, हे समजण्याची पात्रता ज्याच्या अंगी येईल तो उन्नत माणूस म्हटला पाहिजे. असा उन्नत आणि सज्जन माणूस हाच माणसाचा ” आदर्श ” होत असतो, त्यालाच आपण देव देवता संत महात्मा महामानव म्हणत असतो.
थोडक्यात काय तर, प्रकृती आणि प्रवृत्ती नुसार बनलेल्या माणसाने सम्यक बुद्धीचा वापर करून सज्जनांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करणे हे महत्त्वाचे.
लेखक : दत्ता तुमवाड.
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक : 20 सप्टेंबर 2025. फोन : 9420912209



