दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : श्री संत मुक्ताबाई संस्थान, श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर यांच्यावतीने दिला जाणारा भागवत धर्म प्रसारक पुरस्कार बातमीदार राजेंद्रकृष्ण कापसे यांना जाहीर झाला आहे. संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड.रवींद्र भय्यासाहेब पाटील यांनी पुरस्काराची घोषणा केली. सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, संदीप पाटील, सूर्यकांत भिसे, विनायक हरणे उपस्थित होते.
ॲड.पाटील म्हणाले, ”स्वर्गीय भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायातील एका पत्रकाराला हा पुरस्कार देण्यात येतो. आषाढी एकादशीच्या दिवशी बुधवारी (ता. १७ जुलै) सकाळी अकराला पंढरपूर येथील संत मुक्ताबाई संस्थान मठात पुरस्काराचे वितरण होणार आहे. कापसे यांनी बारा वर्षे आषाढी वारीचे वार्तांकन केले आहे.
‘सकाळ’मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे तर ‘लोकसत्ता’मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वार्तांकन त्यांनी केले आहे. श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या सायकल यात्रेच्या नियोजनात त्यांचा सहभाग राहिला आहे.


