महाराष्ट्रात प्रथमच भंडारा जिल्ह्यात आढळला ‘ग्रेटर स्कुप’ व ‘मोठा स्वरल बदक’… — ग्रीनफ्रेंड्स तर्फे लागोपाठ 24 व्या वर्षी स्थलांतरित पक्षी गणना… — ग्रेटर स्कुप व मोठा स्वरल बदकाचे थेट अमेरिका खंडातून आगमन..

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

लाखनी :- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी मागील 24 वर्षांपासून हिवाळ्यात स्थलांतरित पक्षीनिरीक्षण व गणना करत असून सोबतच उन्हाळा व पावसाळ्यात सुद्धा स्थानिक पक्षी निरीक्षण व गणना मागील 24 वर्षापासून करीत असतात.यावर्षीची स्थलांतरित पाणपक्षी गणना डिसेंबर ते 15 मार्चच्या 15 तारखेपर्यंत घेण्यात आली.यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील स्थलांतरित विदेशी पक्षी असलेल्या 40 पेक्षा जास्त तलावावर व नदीपात्रात स्थलांतरीत विदेशी पाणपक्ष्यांचे निरीक्षण ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे करण्यात आले.यावर्षीच्या पाणपक्षी निरीक्षणांचे वैशिष्ट्ये म्हणजे दोन दुर्मिळ विदेशी स्थलांतरित बदक ग्रेटर स्कुप व मोठा स्वरल बदक ज्यांची महाराष्ट्रातील प्रथमच नोंद ठरली आहे.

           ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की ग्रेटर स्कूप बदक यापूर्वी मणिपूर राज्यात , मध्यभारत व उत्तरभारतात आढळण्याची तुरळक नोंद आहे.मुंबईमध्ये सुद्धा 1950 च्याअगोदर आढळण्याची तुरळक नोंद आहे.

         यावर्षी भंडारा जिल्ह्यातील तलावात ग्रेटर स्कुप प्रजातीच्या 8-9 बदकांचा थवा 2-3 दिवसाच्या मुक्कामाने आला.याचे शास्त्रीय नाव ‘आयथ्या मारिला’ असे आहे व उत्तर अमेरिका ,आर्क्टिक किनारपट्टी भागातून तसेच युरोपच्या खंडातून स्थलांतर करीत पूर्वेकडील देशाकडे जपान,कोरिया,चीन इत्यादी देशात जातो.सुरवातीला हा बदक प्रा. अशोक गायधने यांना नेहमीचा शेंडीबदक(टफ्टेड डक)वाटला परंतु पुन्हा पुन्हा वारंवार निरीक्षण बारकाईने केल्यानंतर हा थवा दुर्मिळ ग्रेटर स्कुप बदकाचा असल्याचे सिद्ध झाले व महाराष्ट्रातील प्रथमच नोंद या बदकाची झाली.

          त्याचप्रमाणे मोठा स्वरल बदक (इंग्रजी नाव-‘फल्वस व्हीस्लिंग डक’ शास्त्रीय नाव -डेंड्रोसिग्ना बायकलर)सुद्धा भंडारा जिल्ह्यातील एका तलावावर 15- 20 च्या संख्येने थवा आढळला असून दुरून पाहताना छोटा स्वरल प्रमाणे दिसून येत असतो. पण आकाराने मोठा व अधिक पिवळसर असल्याने मोठा स्वरल बदक असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

            छोटा स्वरल बदक भारतात सर्वत्र आढळत असतो पण मोठा स्वरल बदक मात्र दक्षिण भारतात तेलगांना,आंध्रप्रदेश, तामिळनाडू इत्यादी राज्यात इबर्ड मध्ये नोंद भरपूर प्रमाणात दाखवीत आहे.याचे मूळ अस्तित्व दक्षिण अमेरिका खंड ,दक्षिण आफ्रिका खंड व हिवाळ्यात भारतातील दक्षिण भागात याचे स्थलांतर होत असते.

           अशाप्रकारे यावर्षीच्या हिवाळी स्थलांतरित पक्षी गणनेत दोन दुर्मिळ बदक प्रजातीचा समावेश महाराष्ट्राच्या यादीत नव्याने झाल्याने भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील पक्षीप्रेमीत एकच आनंदाची लहर पसरली आहे.

           यापूर्वी सुद्धा ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने हिवाळी पाणपक्षी गणनेत ब्लॅक स्टार्क,व्हाइट स्टार्क,व्हाईट नेकेड स्टार्क इत्यादी दुर्मिळ पक्ष्यांची नोंद घेतली आहे. यावर्षीच्या पाणपक्षी गणनेत ग्रेल्याग गुज,बार हेडेड गुज,पिनटेल,स्पून बिल डक, गारगेनी,गढवाल,युरेशियन विजन, काम्ब डक, रेड क्रेस्टेड पोचार्ड,रुडी शेल्डक, कॉमन पोचार्ड,कॉमन टिल, स्पॉट बिल डक,टफ्टेड डक ,वुली नेकेड स्टार्क इत्यादी पाणपक्षी प्रजाती यावर्षी सुद्धा रावणवाडी,शिवणी बांध,नवेगाव बांध,सिरेगाव बांध,सौन्दड, सोमनाळा, भुगाव,गुढरी,खुर्सिपार,कोका अभयारण्य खुर्सिपार तलाव,भिमलकसा,रेंगेपार कोहळी,मानेगाव,साकोली,सेंदूरवाफा रानतलाव,इटियाडोह,कोहलगाव, न्याहारवानी,रामपुरी, इत्यादी स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास असलेल्या तलावावर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या चमुला हिवाळी पक्षी गणनेत आढळले आहेत.

           यातील काही प्रजाती मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने परतीच्या मार्गावर स्वभूप्रदेशात गेले आहेत.महाराष्ट्रात प्रथमच दोन नवीन दुर्मिळ स्थलांतरित बदकांची नोंद घेतल्याबद्दल बी.एन.एच.एस मुंबईचे मुख्य समन्वयक व पक्षीतज्ञ डॉ.राजू कसंबे, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर व बी.एन.एच.एस मुंबईचे सहाय्यक व पक्षीअभ्यासक नंदकिशोर दुधे इत्यादींनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या पक्षी निरीक्षण टीमचे अभिनंदन केले आहे.