पुणे शहरातील अनेकांचे पोलिस संरक्षण काढून घेण्याचे आदेश…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे : पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्त्यांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

           पुणे शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रतिष्ठित नागरिकांना पोलिसांकडून संरक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी पोलीस आयुक्तालयात अर्ज करावा लागतो.पुणे शहरातील ११० जणांना पोलिसांकडून संरक्षण (पोलीस प्रोटेक्शन) पुरविण्यात आले आहेत. या व्यवस्थेत ३५० पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.

           पोलीस संरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा वापर निवडणूक कामांसाठी करण्यात येणार आहे, पुणे शहरातील संवेदनशील ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त कायम राहणार आहे. जेथे आवश्यकता नव्हती, अशा २५ ठिकाणचा बंदोबस्त काढून घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडे ५४ जणांनी पोलीस संरक्षणासाठी अर्ज केले होते.

           त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. शस्त्र परवाना असलेल्या नागरिकांकडून पिस्तूल, रिव्हाॅल्वर, बंदूक अशी शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली असल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी नमूद केले आहे.