उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
‘परिप्रेक्ष्य’या प्रा. यादव गायकवाड यांच्या ग्रंथावर आज १९ ऑगस्ट २०२५रोजी धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात परिसंवाद होत आहे.हा ग्रंथ सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला आहे.परिप्रेक्ष्य हा एक वैचारिक ग्रंथ आहे.परिप्रेक्ष म्हणजे एखाद्या गोष्टीकडे,समस्येकडे बघण्याचा विशिष्ट दृष्टिकोन विचार करण्याची,अर्थ लावण्याची विशिष्ट पद्धती.
प्रा.यादव गायकवाड यांच्या सदर ग्रंथात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताचे नवराष्ट्र निर्माण करण्यासंदर्भात कोणत्या स्वरूपाचा दृष्टिकोन होता याची चिकित्सक व सुलभ अशी मांडणी सदर ग्रंथात केलेली दिसते.
अर्थात हा ग्रंथ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची नवराष्ट्र निर्माण विषयक समग्र भूमिका मांडणारा नाही,तर नवराष्ट्र निर्मणासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण अशा पैलूंच्या संदर्भात डॉ. बाबासाहेबांची कोणती भूमिका होती व त्या पैलूंच्या संदर्भात त्यांचे कोणते योगदान आहे,याची मांडणी हा ग्रंथ करतो. इंग्रजांनी १९३०-३१ च्या काळात घेतलेल्या गोलमेज परिषदा व या परिषदांमध्ये भारतातील वेगवेगळ्या समूहांच्या प्रतिनिधींशी केलेली चर्चा भावी भारताच्या घडणीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदांमध्ये भारतातील अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून जी वैचारिक मांडणी केली होती, ज्या मागण्या केल्या होत्या त्या भारताच्या भावी संविधान निर्मितीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या होत्या.
या काळातील काँग्रेसचे सर्वोच्च नेते महात्मा गांधी यांचा अस्पृश्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि बाबासाहेब यांचा दृष्टिकोन यामध्ये भिन्नता होती. भारतातील हिंदूंच्या जातिव्यवस्थेने इथल्या लक्षावधी लोकांना अस्पृश्य बनवून त्यांचे माणूसपण नाकारलेले आहे. अस्पृश्य हिंदू धर्माचा भाग असला तरी हिंदू धर्म त्यांना कुठलेही स्थान देत नाही. हिंदू धर्म व्यवस्थेने ब्रह्मदेवाच्या चार अवयवांच्या माध्यमातून वर्णव्यवस्थेतले चार वर्ण निर्माण झाले असे सांगितले. शूद्र वर्ण हा पायातून जन्मास आला असे सांगितले.
पण इथली वर्णव्यवस्था अस्पृश्यांना पायाचे स्थानही देत नाही तर ती अस्पृश्यांना पायातील जोड्यासारखे स्थान देते अशी मांडणी बाबासाहेब करतात.
सदर ग्रंथात मराठवाड्याशी आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधाबद्दलची तपशीलवार मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात बाबासाहेबांनी घेतलेल्या भूमिकांचे साधार कथन केले आहे.
हा ग्रंथ भारताचे नवे राष्ट्र निर्माण करण्याच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडतो.भावी काळामध्ये देशातील लोकांनी कोणत्या दिशेने वाटचाल केली पाहजे या संदर्भातील उपयुक्त असे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.म्हणून हा ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे.



