Home देशविदेश पेपरफुटी घोटाळा,आश्चर्य कसले?

पेपरफुटी घोटाळा,आश्चर्य कसले?

    सध्याचा ऐरणीवरचा विषय ( करंट इश्यू ) म्हणजे ‘ पेपर फूटी ‘हा घोटाळा.कोणताही घोटाळा संगनमताने होत असतात.पालक आणि कोचिंग क्लासेसच्या मालकांनी केलेला हा घोटाळा आहे,सरकारी घोटाळे हे मंत्री आणि कॉन्ट्रॅक्टर करतात.उद्योग,शेती,बांधकाम,आरोग्य,तसेच धार्मिक आणि कल्याणकारी योजना अशा प्रत्येक क्षेत्रात घोटाळे होतात,छोटे छोटे नव्हे म्हणजे शेकडो नव्हे तर हजारो कोटींचे घोटाळे होतात.

        यास अपवाद शिक्षण क्षेत्र तरी कसे असणार ? कारण हे युग च आहे,घोटाळ्याचे,म्हणजे घोटाळ्याचे.

         पेपरफुटी घोटाळा हा आजचा आणि एकच नाही.यापूर्वीही अनेकवेळा झालेत.अर्थात उघड पडले म्हणून घोटाळा.अन्यथा तो नेहमीच असतो.

     उघड झाला की,काही संवेदनशील लोकांना आश्चर्य वाटते,ते दुःखी होतात,त्यांना अशा गोष्टींची चीड येते,हा अन्याय वाटायला लागतो,म्हणून निषेध,उपोषण,धरणे,मोर्चे,आंदोलन या मार्गाने आपल्या भावना व्यक्त करतात,हे उचितच आहे.परंतु अशा घटना का घडतात ? शिक्षण क्षेत्रात स्पर्धा कशासाठी? अशा घटना आंदोलन करूनही बंद का होत नाहीत? पुन्हा पुन्हा का घडतात? याबद्दल कुणी विचार करताना दिसत नाही.यालाच अज्ञान म्हणतात.

       अज्ञान याचा अर्थ,ज्या घटना घडतात,जे कार्य होते,त्याला कारण असते,ते कारण शोधणे म्हणजे ‘ ज्ञान ‘ होय.आणि कारणावर तात्पुरता उपाय करणे म्हणजे ‘ अज्ञान ‘ होय.आणि उपाय शोधणे हा विवेक होय.एखाद्या रोगाचे कारण न शोधता त्यावर इलाज करणे म्हणजे रोग्याची दुर्दशा करणे,त्याची दिशाभूल करणे,त्याला मरणाकडे घेऊन जाणे होय.त्याच्या आशा वाढविणे,शेवटी त्यास निराश करणे होय.

        म्हणून संवेदनशील कार्यकर्त्यांनी कोणत्याही घटनेकडे डोळस दृष्टीने पहिले पाहिजे.आपण त्या घटना हाताळताना जे उपाय करतो,त्याचे दूरगामी परिणाम बघूनच कृती कार्यक्रम घेतले पाहिजेत.अन्याय अत्याचाराचे प्रश्न हाताळताना लोकांच्या भावनेशी खेळणे होऊ नये,तर त्यातून काही तरी आऊटपुट निघणे जरूरी आहे,न्याय मिळणे जरुरीचे आहे.तरी तो न्याय हा तेव्हढ्या पुरताच असू शकतो,मूळ प्रश्न मिटत नाही.

        याचे कारण ‘ ही भांडवली व्यवस्था आणि लोभ ‘. माणसाचा संपत्तीचा लोभ आणि लोभास प्रोत्साहन देणारी,सहकार्य करणारी ही भांडवलदारी व्यवस्था आणि तिच्या साऱ्या यंत्रणा हे पेपरफुटीचे,आणि घोटाळ्यांचे,अन्याय अत्याचाराचे मूळ कारण आहे.

        स्पर्धा,शोषण,बेकारी,हे या व्यवस्थेचे वैशिष्ट्य व स्वभावच आहे.त्यात बदल होणे शक्य नाही.यासाठी व्यवस्थाच बदलावी लागते.हाच खरा उपाय होय.तात्पुरता नव्हे,कायम उपाय होय.संपती जमा करण्यास ,मोहास सहकार्य,प्रेरणा,मिळते,अशी भांडवली व्यवस्था नष्ट करावी लागते.

      अशा व्यवस्थेत खुद्द शोषण करणारे उद्योगपती भांडवलदार यांच्यात सुद्धा स्पर्धा असते.ते नफा कमविण्यासाठी देशांतर्गत आणि जागतिक स्पर्धा करतात,त्यातून तेजी मंदी येऊन महायुद्धे घडतात.हा भांडवलशाही व्यवस्थेत मोठा दोष आहे.

         म्हणूनच ती नष्ट केल्याशिवाय पेपरफुटी घोटाळे काय,आणि असे इतर क्षेत्रातील अनेक घोटाळे काय,ते कधीच बंद होणार नाहीत.एव्हढे जरी आपणास समजले तरी ठीक आहे.

             लेखक

            दत्ता तुमवाड…

        सत्यशोधक समाज नांदेड…

दिनांक : 19 मे 2026,फोन : 9420912209.