राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे तहसील कार्यालय, कुरखेडा यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ चे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उदघाटन तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी मालेवाडा येथील सरपंच अनुसया पेंदाम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, वैभव आंबेकर, सत्यनारायण चकनपूरक, माजी जिल्हा परिषद सदस्या गीता कुमरे, माजी पंचायत समिती उपसभापती श्रीराम दुगा, तालुका आरोग्य अधिकारी गहाणे, तालुका कृषी अधिकारी रूपाली जाधव, विस्तार अधिकारी भोंगे, माजी ग्रामपंचायत सदस्या वनस्कर, अंगारा येथील सरपंच कोकोडे, चरविदंड येथील सरपंच भूपाल कुमरे, केंद्रप्रमुख हेमंत सुकारे तसेच मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी आकाश नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. यात जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, भोगवटदार वर्ग-१ मंजुरी आदेश, लक्ष्मी मुक्ती योजना आदेश, नाव दुरुस्ती आदेश तसेच घरकुलधारकांना पाच ब्रास मोफत रेती वाटप आदेश आदींचा समावेश होता.
याशिवाय आरोग्य विभागामार्फत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध विभागांच्या योजनांची माहिती देत मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मालेवाडा मंडळातील अनेक लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रवीण नैताम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालेवाडा मंडळ व तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



