Home Maharashtra पावसाच्या सरीत माऊलींच्या मानाच्या अश्वांचे अलंकापूरीत आगमण…

पावसाच्या सरीत माऊलींच्या मानाच्या अश्वांचे अलंकापूरीत आगमण…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : टाळ मृदंगाचा गजर आणि माऊली नामाचा जयघोष करत कर्नाटकमधील अंकलीहून निघालेले संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळ्यातील मानाचे दोन अश्व तब्बल अकरा दिवस पायी चालून आज सायंकाळी रिमझिम पावसाच्या सरीत भक्तीमय वातावरणात आळंदीत दाखल झाले. अश्वांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण असून आळंदीकरांनी सनई चौघड्यांनी स्वागत करत मनोभावे अश्वांचे आळंदी देवस्थानच्या वतीने विधिवत पूजन करण्यात आले.

       बेळगावमधील अंकली ते आळंदी हा तब्बल तीनशे किलोमीटरचा प्रवास अश्वांनी केला. अंकलीहून निघालेले अश्व मिरज, इस्लामपूर पेठनाका, वहागाव, भरतगाव, भुईंज, सारोळा, शिंदेवाडी, पुणे मार्गे आळंदीस आले. सायंकाळी चारनंतर आळंदीतील जुन्या पुलापाशी आळंदीच्या वेशीवर आल्यानंतर बिडकर वाड्यात विश्रांतीसाठी अश्व थांबले. 

     शितोळे सरकारांच्यावतीने अश्वांच्या आगमनाचा निरोप देण्यात आला. यानंतर गुरू हैबतबाबांची दिंडी परंपरेप्रमाणे घेऊन अश्वांना सामोरे गेले. यावेळी वेशीवर अश्वांचा सन्मान करण्यात आला. वाजत गाजत अश्व आळंदीत दाखल झाले. त्यानंतर कारंजे मंडपात देवस्थानच्यावतीने नारळ अश्वावरील स्वारांना देण्यात आले. नंतर अश्व विश्रांतीसाठी गेले. यावेळी उर्तिजसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे, सोहळाप्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर बुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, पालखी सोहळामालक ऋषिकेश आरफळकर, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे पाटील, योगेश आरु, राजाभाऊ चोपदार, ज्ञानेश्वर वीर यांची उपस्थिती होती.

       तदनंतर माऊलींचे मानाचे अश्व फुलवाले धर्मशाळेत विसावले. वारकरी भाविकांनी अश्वांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.