शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आधारभूत दराने धान खरेदी तात्काळ सुरू करण्याबाबत तातडीची मागणी शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामातील धान कापणी पूर्ण झालेली असून धान विक्रीसाठी पूर्णतः तयार आहे.शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत दराने धान खरेदी करणे ही केवळ योजना नसून शेतकऱ्यांचा हक्क आहे असे उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
तथापि,अद्यापही तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आहे.
शासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना धान साठवणुकीचा खर्च सहन करावा लागत असून खासगी व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दराने धान विक्री करण्याची वेळ येत आहे.ही बाब अत्यंत दुर्दैवी अन्यायकारक व शासनाच्या धोरणाविरोधात आहे असेही निवेदनात नमूद आहे.
जर तात्काळ धान खरेदी सुरू करण्यात आली नाही,तर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही,याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील.
तरी शासनाच्या आदेशानुसार मौजा चिमूर तालुक्यात आधारभूत दराने धान खरेदी तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत,तसेच खरेदी केंद्र,नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेबाबत स्पष्ट सूचना त्वरित जाहीर करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.
धान खरेदी आधारभूत विषयावर त्वरित व सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्याल,अशी अपेक्षा तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्याकडे उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.
निवेदन देताना श्री.लहू काशीनाथ भोयर रा.पांजरेपार,श्री.शरद झिंगरु निकुरे रा.शंकरपूर हे शेतकरी उपस्थित होते.
सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांना पाठविण्यात आली आहे.



