संतप्त गावकऱ्यांनी कोलारा ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप…

   रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

          ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मधील चिमूर तालुक्यातील कोलारा (तुकूम) गावातील नागरिकांनी सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले. रात्री पासून ग्रामपंचायत कुलूपबंद असून ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली आहे.

       राष्ट्रीय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये कोलारा (तुकूम) गाव वसले आहे. अनेक वर्षापासून कार्यरत कोलारा प्रवेशद्वारातून कोअर व बफर झोन मध्ये पर्यटन सफारी सुरू आहे. गावातून प्रवेशद्वार असल्याने अनेकांना जिप्सी चालक, मालक, गाईड व अन्य मार्गाने रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रवेशद्वाराच्या आत कोअरझोनमध्ये अनेक कुटूंबांची शेती आहे. शेती काम असो वा जनावरे चारण्याकरीता वन विभागाच्या जाचक नियमांनी शेतकऱ्यांवर पायबंद घातले आहे. तसचे हिंस्त्र वन्य प्राण्यांच्या हल्याच्या भिती, वन्य प्राण्यामुळे पिकांची होणारी नासाडी या कारणास्तव बहुतांश शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे वनविभागाने फायर लाईनकडे कोअर जंगल क्षेत्र प्रवेशद्वार उभारावे, अशी अनेक वर्षांपासून गावकरी, शेतकऱ्यांची मागणी आहे. त्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. सदर मागणी पूर्ण व्हावी, याकरीता कोलारा ग्राम पंचायतीचे सरपंच तथा समिती गावकऱ्यांना विश्वासात घेऊन पत्रव्यवहार, पाठपुरावा करीत नसल्याने नागरिकांत प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.

        कोलारा तुकुम ग्रामपंचायत मध्ये २८ ऑगस्टला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबती केल्याने त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता सरपंच शोभा कोयचाडे यांनी पळ काढल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. ग्रामसभेत पारीत झालेल्या ठरावाव्यतिरिक्त सरपंच यांनी, स्वत:च्या मनमर्जीणे ग्राम पंचायत सदस्य, शासकिय नोकरीदार तसेच विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींचे नावे जिप्सी पर्यटनाला लावण्याकरीता व गाईडसाठी टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केल्यानंतर तंटामुक्ती समिती अध्यक्ष रतिराम वांढरे, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष रतिराम डेकाटे यांचे नेतृत्वात गावातील चौकात नागरिकांची बैठक घेण्यात आली.

      यावेळी सरपंच व वनसमितीने केलेल्या अनागोंदी कारभारावर चर्चा केली. बैठकीमध्ये सरपंच व वनसमितीच्या विरोधात प्रचंड असंतोष उफळून आला. त्यामुळे काल रविवारी रात्रीसाडेदहाच्या सुमारास ग्राम पंचायत कार्यालयाकडे कुच केले. सरपंचांनी राजीनाम द्यावा, ग्राम पंचायत बरखास्त करावी अशी मागणी रेटून धरीत ग्रामपंचायात कार्यालयास कुलुप ठोकले. योवळी गावातील शेकडों महिला पुरुषांची उपस्थिती होती. मंगळवारी तालुका प्रशासनाचे अधिकारी दाखल होऊन ग्राम पंचायत सुरू करण्यार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

          २८ ऑगस्टला घेतलेल्या ग्रामसभेत काही व्यक्तीनी दारू पिऊन गोंधळ घातला. ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठराव विषयाकडे कुणीही गांभीर्यांने लक्ष दिले नाही. उलट त्यांनीच आम्हाला विश्वासात घेतले नाही,असा आरोप केला. हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. गावकऱ्यांनी ग्रामपंचातला कुलुप ठोकल्याने चिमूर पोलिस स्टेशनला माहिती देण्येात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे, अशी प्रतिक्रीया कोलारा ग्राम पंचायतीचे सरपंच शोभा कोयचाडे यांनी दिली.