Home Social आमचे प्रिय दादा म्हणजे आमच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ बाबा!… — स्मृती...

आमचे प्रिय दादा म्हणजे आमच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ बाबा!… — स्मृती दिनानिमित्त…

         आम्ही चार बहिणभाऊ,तिघे भाऊ व एक बहिण!आम्ही आमच्या बाबांना अगदी आदरपूर्वक तथा मैत्रीपुर्वक,”दादा,म्हणायचो…

          आमचे दादा म्हणजे आमचे सर्वस्व होते!”त्यांचे मन व मनातंर्गत विचार आणि श्रम आधार हे आमचे भविष्य होते.म्हणूनच,”आमचे प्रिय दादा म्हणजे आमच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ बाबा होते,याबाबत प्रामुख्याने व्यक्त होतो आहे.

          आमचे,”दादा,एकही अक्षर न शिकलेले अडाणी,पण भयंकर सुशिक्षित आणि दूर दृष्टीतील चिकित्सक समजदार होते.याचबरोबर शांत व स्वयंमी होते.

          लहान मुलं-मुली असोत की,वयाने मोठ्या महिला भगिनी व पुरुष असोत,ते उभ्या आयुष्यात कुणालाही व कधीही अयोग्य शब्दात बोलले नाही.सर्वांचा आदर करुन बोलणे हि त्यांची काळजीपूर्वक कार्यपद्धत होती.

      त्या काळी गावातील नागरिक जात व धर्म बघून एखाद्या व्यक्तीचा आदर व सन्मान करायचे किंवा त्यांना विशेष शब्दात योग्य किंवा अयोग्य बोलायचे..

       मात्र त्यावेळी अत्यंत हालाखीची परिस्थिती असली तरी आमच्या,”दादांना, कुणीही अपमान करुन बोलत नव्हते.उलट,”ये भिवा,कसे चालेल तुझे!”तुझे पोरं काय करतात,शिकत आहेत ना बरोबर,तुच होस म्हणून अशाही हालाखीच्या परिस्थितीत पोरांना शिकवत आहे रे बापा!..

            माझ्या आईची प्रकृती अत्यंत गंभीर होती.ती वाचेल असे कुणालाच वाटतं नव्हते,बरेच वर्षे ती खाटेवर पडून होती.

           अशाही गंभीर तथा विपरीत परिस्थितीत आमच्या दादांनी मोठ्या धैर्याने व आत्मविश्वासाने परिस्थितीला समजून घेत गंभीरपणे आयुष्याला पुढे नेले..

      कधी कधी तर घरी अन्न राहात नव्हते,”काय खावे व कसे जगावे,हा प्रश्न बऱ्याच दा आवासुन पुढे असायचा..‌

        अशाही बिकट परिस्थितीत आमच्या,”दादांनी,आमच्या चारही भावांची शिक्षणाची दारे बंद होऊ दिली नाही.

           आमचे,”दादा,राबराब राबले,कठीणातले कठीण श्रम केले.उन,पाऊस,थंडीच्या मोसमात सुध्दा त्यांनी कठीणातले कठीण श्रम केले ते म्हणजे आमच्या आईचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी!…

      एक प्रसंग मी काळजात साठवून ठेवला आहे.तो म्हणजे तिन्ही मुलांना श्रीमंतांकडे नौकर ठेवण्याचा!

       गावातील एक श्रीमंत व्यक्ती घरासमोर आले आणि आमच्या दादांना बघून म्हणाले,”ये भिवा,अरे तुझी परिस्थिती फारच गंभीर आहे रे,तुझ्या तिन्ही मुलांना चार-चार पायली ज्वारीला नौकर ठेवणारे,तुला कसाही आधार होईल!…

       त्या श्रीमंत व्यक्तींचे हे शब्द मन हेलावून टाकणारे होते आणि दारिद्रयातील परिस्थितीचे वास्तव्य वर्णन करणारे होते.

       त्या श्रीमंत व्यक्तींचे म्हणणे काही चुकीचे नाही असे मला क्षणभर वाटले.कारण त्यांनी आमच्या परिस्थितीला अनुसरून बोललेले त्यांचे ते शब्द होते.मात्र,दादा काय बोलणार याकडे माझे बारकाईने लक्ष होते.

       पण,”आमच्या दादाचे उत्तर ऐकून तर मी निशब्द झालो होतोय.,त्या श्रिमंत व्यक्तींच्या शब्दांना अनुसरून माझे दादा असे बोलले की,”ये बाबा,मी खूप काबाडकष्ट करतो आहे,या वेदनादायक श्रमाचे अवघड महत्त्व काय आहे हे मी जाणतो आहे.म्हणूनच अशाही हालाखीच्या परिस्थितीत मी माझ्या चारही मुलांना शिकवतो आहे.

       त्यांनी स्वतःला समजून घ्यावे यासाठी,त्यांनी स्वतःच्या परिस्थितीला समजून घ्यावे यासाठी,त्यांनी नातेवाइकांना समजून घ्यावे यासाठी,त्यांनी स्वतः सक्षम बनावे यासाठी,त्यांनी स्वतः स्वावलंबी बनावे यासाठी,त्यांनी स्वाभिमान ओळखावे यासाठी,”बाबा!.. 

       आमचे दादा,परत त्या श्रीमंत व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले,”माझे काही चुकते का बाबा,आजचे असेही दिवस निघून जातील बाबा,पण मुलांना श्रीमंतांकडे मी कधीच नौकर नाही बाबा!

       त्यांच्या शिक्षणासाठी श्रम घ्यायला तयार आहे बाबा!.प्रसंगी शेती विकेल बाबा!,पण माझ्या मुलांनी कुणाचीही चाकरी करु नये,यासाठी धडपडतोय बाबा!..

       केवळ त्यांच्या पुरतेच जिवन शिल्लक नाही ना,”बाबा! माझ्या श्रमात त्यांच्या मुलाबाळांचेही भविष्य आहे बाबा!

      म्हणूनच माझ्या काबाडकष्टात मी माझ्या मुलांचे समाधान,सुख,योग्य आयुष्य,व आनंद बघतो आहे,”बाबा!

        माझ्या दादांच्या शब्दाला अनुसरून श्रिमंत व्यक्ती म्हणाले धन्य आहेस रे तु भिवा!,”शिकव तु तुझ्या मुलांना….

        सदर श्रीमंत व्यक्ती हे गाव नात्याने माझ्या बाबांचे काका तर आमचे आजोबा लागायचे!मात्र ते स्वजातीय नव्हते,पण त्यांची आत्मियता खरच बोलकी होती!

         आमचे,”दादा,शांत व स्वयंमी असल्याने ते विचार पुर्वक योग्य निर्णय घेत,ते सर्वांच्या भावनांना जपण्यासाठी सदैव तत्पर राहात,सर्व नातेवाईकांना आदराने बघत व त्यांचा मानसन्मान सुध्दा आदरणानेच करत..

           आमच्या,”प्रिय दादा मुळे म्हणजेच आमच्या बाबांमुळे आम्ही चारही भाऊ सक्षम झालोत हेच आमचे खरे वैभव आहे.

       असे,”दादा,वडील म्हणून लाभणे हे आमचे उत्तम कर्मच आहे असे समजावे लागेल!

          परंतु त्यांचा हृदय विकाराच्या पहिल्या झटक्याने दिनांक १७/०८/२/१९९५ ला माझ्या व मोठ्या वडीलांचे चिरंजीव म्हणजे श्री.वामन भाऊंच्या हातावर होणारा मृत्यू मनाला असंख्य चटके देऊन गेलाय…

     त्यांच्या मृत्यूनंतर अख्या गावातील नागरिक व सर्व नातेवाईक हळहळ व्यक्त करीत होते तर अनेकांनी उत्तम भावना अनावर करीत अश्रूला मोकळे केले होते…

      “भिवा,तुझ्या सारखा व्यक्ती मिळणे कठीण रे!या शब्दशः भावना ऐकून माझे मन परत पतर भरुन यायचे,आणि सातत्यपूर्ण डोळे ओलेचिंब व्हायचे!…

     “,आमचे वडील श्री.भिवाजी येमुणी येसा रामटेके!….

       आज त्यांच्या ३० व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि कोटी कोटी प्रणाम!. 

    “प्रिय दादा,तुझाच चिरंजीव! 

             प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक – दखल न्यूज भारत वेब पोर्टल….

— माजी कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश नरवडे ग्लोबल जागतिक ह्युमन राइट्स असोसिएशन…

— माजी विदर्भ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई…
दिनांक:- १७/०८/२०२५,रोज रविवार…