Home Maharashtra आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील उड्डाणपुलांना साधुसंतांची नावे द्यावीत :– युवराज शिंदे यांची मागणी…

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील उड्डाणपुलांना साधुसंतांची नावे द्यावीत :– युवराज शिंदे यांची मागणी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावरील सर्व उड्डाणपूलांना महाराष्ट्रातील थोर साधुसंतांची नावे देण्याची मागणी केली आहे.

       यासाठी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ.भावार्थ देखणे आणि श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन आळंदी ‌देवस्थानला देण्यात आले.

      यावेळी युवराज शिंदे म्हणाले, “आळंदी ते पंढरपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (NHAI) अनेक उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्र हा संतपरंपरेचा वारसा लाभलेला राज्य असून या महामार्गावरील उड्डाणपूलांना संतांची नावे दिल्यास भाविकांच्या श्रद्धेला पूरक ठरेल. तसेच ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल.”

      शिंदे यांनी पुढे सांगितले की, “वारीमध्ये विविध जाती-धर्मांचे भाविक सहभागी होत असतात. म्हणून या महामार्गाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख मिळावी यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी.”

       या मागणीला सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे व विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा यांनीही पाठिंबा दर्शवला असून त्यांनी लवकरच यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे स्पष्ट केले.