Home Maharashtra घरकुल योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सरसकट अडीच लाख रुपये देण्याची ग्रामीण...

घरकुल योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सरसकट अडीच लाख रुपये देण्याची ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदनाद्वारे मागणी… — शंकरपुर ग्रामपंचायत उपसरपंच अशोक चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र ग्रामीण विकास मंत्र्याना पाठवले पत्र.. — निवेदनात अनेक मागण्यावर भर…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

       शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना सरसकट २, लाख ५० हजार रु. अनुदान मिळण्यासंबंधाने चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदनाद्वारे,चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी मागणी केली आहे.

          तद्वतच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल योजनातील लाभार्थ्यांना जाहीर केलेल्या ५०,०००/- रु.च्या वाढीव अनुदानाची अंमलबजावणी अजूनपर्यंत केली नसल्याची आठवण उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे करुन दिली. 

         याचबरोबर राज्यशासन निर्णया नुसार २०२४-२५ मध्ये उद्धिष्ट मिळालेल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांना ३५,०००/- रु. घरकुल बांधकामासाठी व १५,०००/- रु.सौर उर्जा प्रणालीसाठी देण्यात येणार होते.

           मात्र अद्यापर्यंत या रक्कमेचा प्रत्यक्ष लाभ कोणत्याची लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही याबाबत सुध्दा संबंधित मंत्री आणि संबंधित अधिकारी यांना उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे अवगत करून दिले आहे. 

            निवेदनात म्हटले आहे की,घरकुल बांधकाम साहित्याचे वाढते दर व अल्प अनुदानामुळे अनेक घरकुलाचे काम रखडले असून काहीं घरकुल लाभार्थ्यांनी स्वतःच्या श्रमावर आणि उसनवार कर्जला अनुसरून घर बांधकाम पूर्ण केले आहे.अशा घरकुल लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळाले नाही असेही निवेदनात नमूद केले आहे.

     याचबरोबर काहीं घरकुल लाभार्थी वाढीव अनुदानाच्या प्रतीक्षेत असून त्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरु केले नाही तर काहींची घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत असेही निवेदनकर्ता उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे. 

      योजनेचे उद्धिष्ट गरीब व गरजू कुटुंबाना कायम स्वरूपी घर उपलब्ध करून देणे असताना वाढीव अनुदानाची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांत चिंतेचे वातावरण आहे.त्यामुळे शासनाने या अनुदानाची रक्कम कोणत्या टप्यात व कोणत्या प्रक्रियेद्वारे मिळणार आहे याबाबत स्पष्ट करून तातळीने घरकुल बांधकामासाठी सरसकट २ लाख ५० हजार रु. वाढीव अनुदान द्यावे अशी मागणी उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.

          घरकुल लाभार्थ्यांना वाढीव अनुदान न दिल्यास येत्या काळात घरकुल लाभार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषद समोर भिकमांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच अशोक चौधरी यांनी संबंधित मंत्र्यांना दिला आहे. 

           निवेदनाच्या प्रती पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा तथा, आदिवासी विकास विभाग मंत्री डॉ.अशोक उईके व चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना सुध्दा देण्यात आल्या आहेत.