उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक…
चंद्रपूर १५ एप्रिल…
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती,उपसभापती तसेच झोन क्र. १, २ व ३ सभापती पदाची निवड करण्यासाठी दि.१७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या कालावधीत विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा महानगरपालिकेच्या गांधी चौक येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील “राणी हिराई” सभागृहात पार पडणार आहे.
सदर बैठक जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असून या पदांच्या इच्छुक सदस्यांची नामनिर्देशन पत्रे उद्या दि.१६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दुपारी ३.०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
त्यानंतर शुक्रवार १७ एप्रिल रोजी सभा सुरू झाल्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल.वैध नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.
जर एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले,तर हात उंचावुन मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.
झोन क्र.१ साठी ११ वाजता,झोन क्र.२ साठी १२ वाजता,झोन क्र.३ साठी १ वाजता तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती,उपसभापती पदासाठी २ वाजता निवडणुक प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
या सभेतील निवडणूक प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.



