शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर : चिमूर तालुक्यातील मौजा परिसरातील घरकुल योजनेअंतर्गत निवड झालेल्या अनेक लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळाले नसल्यामुळे त्यांची घरे अपूर्ण अवस्थेत असून सुरू झालेले बांधकाम रखडले आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घरकुल योजनेचा उद्देश गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सुरक्षित व पक्के निवासस्थान उपलब्ध करून देणे हा आहे.
मात्र,अनुदान वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले असून काही ठिकाणी बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबले आहे.यामुळे संबंधित कुटुंबांना उघड्यावर किंवा असुरक्षित घरांमध्ये राहण्याची वेळ येत आहे.
या गंभीर समस्येची शासनाने तात्काळ दखल घेऊन प्रलंबित अनुदान त्वरीत वितरित करावे,तसेच सुरू असलेल्या घरकुल बांधकामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात,अशी मागणी शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
तसेच,भविष्यात अशा प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी घरकुल योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी,अशीही मागणी त्यांनी केली आहे.



