Home देशविदेश छावा आणि कावा…..

छावा आणि कावा…..

                 छावा म्हणजे सिंहाचे पिल्लू.संभाजी महाराजांना छावा म्हणून त्यांचा पराक्रम म्हणून चित्रपट आणि मालिकेतून काय दाखवायचे आणि काय दाखवायचे नाही ? हे ठरविणे म्हणजे “कावा”.

        आपल्या देशात जे शूर वीर आणि संत महात्मे आणि महापुरुष होऊन गेले,त्यांनी जो पराक्रम केला,जे कार्य केले,ते तसे का केले ? त्यामागचे कारण काय होते ? आपले राज्याचा विस्तार करण्यासाठी लढाया करीत होते ? की आपला धर्म आणि जात टिकवण्यासाठी त्यांचे कार्य होते ? अर्थात यामागचे सत्य काय ? त्याचे संशोधन करीत बसण्यापेक्षा आणि आपल्या संकुचित विचारानुसार शालेय पुस्तकात धडे आणण्यापेक्षा आणि संकुचीत इतिहास निर्मिती करण्यापेक्षा म्हणजेच त्यांचा पराक्रमाचा उद्देश केवळ आपली जात आणि धर्म टिकविणे आणि मजबूत करणे हा उद्देश त्यांचा होता,असे संकुचित इतिहास मांडून अशा पराक्रमी ,आणि थोरा मोठ्यांना छोटे करणे होय.आणि जाती धर्मात तेढ उत्पन्न करणे होय.

        खरे तर शिवाजी संभाजी महाराज,शाहू फुले आंबेडकर , बुद्ध कबीर पैगंबर,येशू सर्व तीर्थंकर गुरुनानक हे सारे पराक्रमी आणि बुद्धिमान महापुरुष यांनी जातीसाठी किंवा धर्मासाठी म्हणून कार्य केलेले नाही,तर अखिल मानवजाती साठी कार्य केले आहे.अल्पबुद्दीचे,संकुचित विचाराचेच लोक केवळ जात आणि धर्म अशा संकुचित गोष्टीसाठी कार्य करतात.ते विकृत असतात.

      संकुचित विचाराचे लोक दुर्गुणी असतात.त्यांच्यात अहंकार खच्चून भरलेला असतो,म्हणूनच असे अहंकारी लोक क्रोध मोह मान द्वेष मत्सर,सुड भावना , भेदाभेदी विचार या दुर्गुणी लोकात असतात.म्हणूनच त्यांना जात आणि धर्म हा हे आपले शेत आहे,असे वाटते,म्हणून त्यास कुंपण घालने आणि त्याचे संरक्षण करावेसे वाटते.

       परंतु जे सद्गुणी लोक आहेत,पराक्रमी आहेत,मोठ्या विचाराचे आहेत,त्यांचा स्वतःवर विश्वास वाटतो,स्वतःचे कार्य आणि पराक्रमावर असतो,म्हणून ते जाती आणि धर्माच्या या संकुचित कुंपणात अडकून पडत नाही.यांचा दृष्टिकोन मुळातच व्यापक असतो,समतेचा असतो.म्हणून माणसा माणसात असे पराक्रमी आणि मानवाला,समाजाला,देशाला दिशा देण्याचे काम करतात.यांचे विचार ध्येय आणि कार्य हे महानच असते. माणसा माणसात भेदभाव करीत नाहीत.अखिल मानवजात म्हणजे समुद्र होय,नद्या नव्हेत.अखिल मानवजात म्हणजे विशाल आकाश धरती विशाल डोंगर जंगल वाटते,ज्यास धुरे बंधारे नाहीत.

          सर्व माणसे अवयवाने सारखीच असताना,त्यांचेत कसल्याच प्रकारचा भेद नसताना ” हा या जातीचा,आणि तो त्या धर्माचा “असा भेद दुर्गुणी माणसांनी,आपला स्वार्थ साधण्यासाठी केला,अजूनही ती परंपरा चालूच आहे.जाती आणि धर्म निर्माण करून,त्यांचे महत्व पटविण्याचे,ते पक्के करण्याचे काम अजूनही या विकसित आणि वैज्ञानिक 21 व्या शतकातही कुशल पूर्वक ठरवून केल्या जाते.

       शालेय पाठ्यक्रमात बदल करणे,नाटक,भाषण,चित्रपट,पुस्तके ,संघटना,पक्ष या माध्यमातून इतिहासाचे सादरीकरण केल्या जात आहे,तेही विषमतावादी दृष्टिकोनातून विषमतावादी इतिहास जो आहे,किंवा नसला तरी तसा तयार करून आम् जनते पुढे मानण्याचा कावेबाजपणा करण्यात येत आहे.

        हे असे कोण करीत आहेत ? तर असे कृत्य राजकीय लोक आपणास मते मिळवण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी करताहेत,आणि भांडवलदार जमीनदार आपली मालमत्ता जपून राहण्यासाठी आम् जनता एक होऊ नये,त्यांनी शोषणाविरुद्ध उठाव करू नये,यासाठी जाती धर्माची भांडणे लावण्याचा कावेबाजपणा करताहेत,तसे पुरोहित ज्यांचे पोट देव देवळे आणि धर्मावर अवलंबून आहे,जे ऐतखाऊ आहेत,असे सर्वच मठ,देवस्थाने ,महाराज हे जे श्रम न करता ऐश करतात असे लोक धर्म मजबूत करण्याचे काम करताहेत.

        यांचा हा स्वार्थ ,यांचे शोषण,यांची भेदनिती,यांचा संकुचितपणा,यांची दुष्टनिती,यांचे कार्य म्हणजेच कावेबाजी होय.यांचे जातीचे आणि धर्माचे कटकारस्थान सामान्य जनतेनी आणि विचारवंतानी,साहित्यकार,पत्रकार,कलाकार,शिक्षक ,सर्व राजकीय,धार्मिक,सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच सावध होऊन यांचा छावा आणि कावा हा लोकांसमोर उघड केला पाहिजे.

             शूरवीर,पराक्रमी,महात्मे,महामानव,यांनी जाती आणि धर्मासाठी कार्य केले नाही,उलट जाती धर्माच्या भिंती,धुरे नष्ट व्हावेत,अखिल मानवजात एक व्हावी म्हणून कार्य आणि पराक्रम केला आहे,हे चित्रपटातून दाखविण्याची गरज आहे,छावा हा धर्मासाठी नसून ,मुस्लिम विरोधी नसून मुस्लिमांनाही सोबत घेऊन अन्याय अत्याचार करणाऱ्या सरंजामशाही,घराणेशाही याच्या विरोधासाठी छाव्याची लढाई होती,असे दाखवायला हवे होते,केवळ मुस्लिम द्वेष पेटविण्याचा कावा म्हणजे हा चित्रपट छावा होय,काश्मीर फाईल होय,हे असे सिनेमे पाहून दृष्ट्या लोकांच्या लक्षात येते.

     लेखक :- दत्ता तुमवाड…

       सत्यशोधक समाज नांदेड…

           दिनांक : 15 एप्रिल 2025.

                 फोन : 9420912209.