ग्रँड मास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज १६ व १७ रोजी भंडारा, गोंदिया जिल्ह्यात…. –“अनुभव शिफुजींचे, प्रश्न भावी सैनिकांचे” कार्यक्रमातुन युवकांशी साधणार मुक्त संवाद….

 

प्रितम जनबंधु

संपादक 

 

भंडारा :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाचे औचित्य साधून खासदार सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने ग्रँड मास्टर, कमांडो ट्रेनर शिफुजी शौर्य भारद्वाज यांच्या युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन भंडारा व गोंदिया जिल्ह्यात 16 आणि 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.

           मेरी मिट्टी मेरा देश, मिट्टी को नमन आणि वीरों को वंदन या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम घेत शिफुजी शौर्य भारद्वाज आणि युवकांमध्ये थेट संवाद साधून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न खासदार सुनील मेंढे यांच्याकडून होत आहे. क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद यांचे नातू आणि देश सेवेसाठी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ देणारे शिफुजी भारद्वाज हे ग्रँडमास्टर आणि प्रसिद्ध कमांडो ट्रेनर म्हणून ओळखले जातात. युवकांमध्ये देशभक्तीचा जागर निर्माण करण्यासाठी त्यांचे उद्बोधन गुणकारी ठरते.

          भंडारा जिल्ह्यातील युवक, युवती आणि पोलिस व सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी 16 व 17 रोजी शिफुजी भंडारा येथे येत आहेत. भंडारा येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात सकाळी 10 वाजता, साकोली येथील बाजीराव करंजेकर महाविद्यालयात दुपारी 1 वाजता आणि गोंदिया येथील पोवार बोर्डिंग येथे संध्याकाळी 4 वाजता युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिफुजी स्वतःचे अनुभव तरुणांसोबत वाटून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत.

         17 रोजी सैन्य आणि पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणांसोबत ते मुक्त संवाद करतील. “अनुभव शिफुजींचे, प्रश्न भावी सैनिकांचे” या नावाने हा उपक्रम होणार असून गोंदिया येथे सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे, दुपारी 2 वाजता भंडारा येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम, क्रीडा संकुल येथे हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह निमित्त भंडारा आणि गोंदिया येथे कार्यक्रम स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन दि.१७ रोजी करण्यात आले आहे.

         देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे उद्बोधन ऐकण्यासाठी आणि अनुभवाची शिदोरी प्राप्त करण्यासाठी युवक युवती आणि भावी सैनिकांनी सहभागी व्हावे, तसेच रक्तदानाच्या माध्यमातून मातृभूमी प्रति आपले कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.