राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांची साकोलीत पत्रकारांशी चर्चा… — साकोली निर्माणधीन पत्रकार भवनासाठी आ. नाना पटोले व आ. डॉ. परीणय फुके यांचे मानले आभार…

    ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असताना आज मंगळवार १३ फेब्रुवारीला पोलीस ठाणे समोर साकोली येथे संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेट दिली. यावेळी त्यांच्या चमुचे स्वागत करण्यात आले. 

      नुकतेच ६ जानेवारीला साकोलीत पत्रकार दिनी तलाव बायपास रोडवर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य “पत्रकार भवन” व फलकाचे लोकार्पण संपन्न झाले. याबाबद पत्रकार भवनासाठी निधी उपलब्धतेसाठी आमदार नाना पटोले व आमदार डॉ. परीणय फुके यांना साकोली पत्रकार शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. 

           आमदार नाना पटोले व आमदार डॉ. परीणय फुके यांनी पत्रकार सेवा भवनासाठी लवकरच निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. याबाबत सविस्तर चर्चाही करण्यात आली. पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संघाला साकोली पत्रकार भवनाच्या निर्माण कार्याला निधी सहकार्य करीत असल्याबद्दल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परीणय फुके यांचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतर्फे हार्दिक आभार मानले आहे.

          सदर पत्रकार भवन हे वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी नसून जनहितार्थ सेवेसाठी येथे पत्रकार भवन उभारले जात आहे. येथे तालुक्यातील व परीसरातील सर्वच प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि न्यूज पोर्टलचे पत्रकार व छायाचित्रकारांना या भवनात बसून जनहितार्थ वृत्तसंकलन करण्यासाठी सोयीस्कर होणार असे प्रतिपादन सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी साकोलीत केले.

           याप्रसंगी नागपूरचे जीवनबोधी बौध्द, नागपूर समाजसेवक सुरेंद्र बुंदेले, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, साकोली शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले, शहर सहसचिव किशोर बावणे, सामाजिक कार्यकर्ता आशिष गुप्ता आणि इतर हजर होते.