Home Maharashtra पंचवटी उड्डाणपुलाखाली झालेल्या अपघातातील मुलीचा मृत्यू… — गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा...

पंचवटी उड्डाणपुलाखाली झालेल्या अपघातातील मुलीचा मृत्यू… — गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

         दखल न्युज भारत

अमरावती :- पंचवटी उड्डाणपुलाखाली घडलेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        घटनानुसार, फिर्यादी महिला व तिची मोठी मुलगी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी काही कामानिमित्त पंचवटी परिसरात आल्या होत्या. फिर्यादी नाश्ता आणण्यासाठी गेल्या असता, त्यांची मुलगी उड्डाणपुलाखाली उभी होती. त्याचवेळी वाहन क्रमांक एमएच ३२ वाय ०७४५ या गाडीच्या चालकाने राधानगरकडून येत यु-टर्न घेताना निष्काळजीपणे वाहन चालवून मुलीला धडक दिली. या अपघातात मुलीच्या छातीसह चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.

          चालकाने जखमी मुलीला लंगडे हॉस्पिटल, कठोरा नाका येथे नेऊन सोडले. पुढे प्रकृती खालावल्यानंतर तिला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान ८ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले की, वाहनचालकाने बेफिकीर आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. त्यामुळे पोलिसांनी बीएनएस कलम १०६(१), २८१, १८४(१), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.