अबोदनागो चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती…
दखल न्यूज भारत…
अमरावती :- जयप्रभा कॉलनी परिसरात सायंकाळच्या वेळी फिरायला गेलेल्या एका महिलेला दोन अज्ञात बाईकस्वारांनी धक्का देत गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेल्याची गंभीर व थरारक घटना घडली.
या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिला दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे गोपाल किराणा स्टोअरजवळ,जयप्रभा कॉलनी परिसरात फिरायला गेल्या होत्या.
त्याच वेळी दोन अज्ञात बाईकस्वार दिल्ली पब्लिक स्कूलच्या दिशेने रॉंग साईडने येत होते.
या दोघांनी महिलेला अचानक धक्का दिला आणि गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची,अंदाजे ₹ ८०,००० किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
फिर्यादीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिस ठाण्यात कलम ३०४(२), ३(५) नुसार (नवीन भारतीय न्याय संहितेअंतर्गत) हिसकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून,आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आले आहे.


