व्यक्तिमत्व म्हणजे माणसाचे बाह्यस्वरूप आणि आचरण याबरोबरच माणसाचे आंतरिक गुण अवगुण.
बाह्यस्वरूप म्हणजे त्याची शरीरयष्टी म्हणजे त्याचे अवयव उंची,त्याची केशभूषा वेशभूषा,तसेच त्याचे आचरण म्हणजे त्याचे चालणे बोलणे वागणे,आणि इतरांशी त्याचा व्यवहार चांगला की वाईट? इतरांना आदर देतो की अनादर करतो,इतरांना समतेची वागणूक देतो की,विषमतेची? त्याचे बोलणे कडू की गोड? उतारावर न्याय करतो की अन्याय? इत्यादी म्हणजे त्याचे आचरण होय,म्हणजेच माणसाचे व्यक्तिमत्व चांगले की वाईट? हे त्याच्या बाह्यआचरण आणि व्यवहारातून समजते.
या बरोबरच माणसाचे आंतरिक सद्गुण आणि दुर्गुण,म्हणजेच एखादा माणूस त्याच्यात जे सद्गुण आहेत,उदा.प्रेम,बंधुभाव,विश्वास,निष्ठा,दया क्षमा,शांती,सत्य,न्याय,निती आदर,त्याग, इतरांना मदत करण्याची भावना,इत्यादी सद्गुणांचा तो व्यवहारात वापर करीत असेल तर अशा व्यक्तीचे व्यक्तिमत्व खुलते,तो सर्वात उठून दिसतो,त्याचा प्रभाव इतरांवर पडतो,तो इतरांच्या कामी येतो.
सद्गुणी माणूस हितकारी असतो,आणि दुर्गुणी माणूस कुटुंबासाठी,गावासाठी,शेजाऱ्यासाठी,देशासाठी,समाजासाठी घातक असतो.दुर्गुण म्हणजे माणसातील राग लोभ द्वेष कपट,मोह माया, स्वार्थ,मान अहंकार,इत्यादी अवगुण.
प्रत्येक माणसात सुप्तगुण असतात,त्यातील काही सद्गुण तर काही दुर्गुण असतात.ज्या व्यक्तीला सद्गुण महत्वाचे वाटतात,तो त्याचा वापर करीत असतो.आणि ज्या व्यक्तीला दुर्गुण महत्वाचे वाटतात तो त्यांचा व्यवहारात वापर करतो,अशा व्यक्तींना दुर्गुणी म्हणतात,अशी माणसे स्वतःचे तर नुकसान करूनच घेतात,पण इतरांचे पण करतात,अशी दुर्गुणी माणसे देशाचे आणि समाजाचे दुश्मन च असतात.सद्गुणी माणसे मात्र समाजास आणि देशाला हितकारक असतात.
ज्यांना कुणाला आपले व्यक्तिमत्व फुलवायचे असेल,त्यांनी आधी सुप्तगुणांचा आविष्कार करावे,म्हणजे ते शोधावे,दाखवावे,एक म्हण आहे ” तूज आहे तूज पाशी,परी तू जागा चुकलाशी ” याचा अर्थ सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही प्रत्येकात असतात,परंतु या पैकी कुणाचा शोध घ्यायचा,आणि त्याचे प्रदर्शन करायचे? हे ठरविता आले पाहिजे? किंवा ठरविले पाहिजे,आपले व्यक्तिमत्व फुलवायचे,त्याचा विकास करायचा ही पुढची गोष्ट आहे.सद्गुणी माणसाचे व्यक्तिमत्व हे केव्हाही दुर्गुण माणसापेक्षा नक्कीच मोठे आणि किंमती असते.
आपले भारदस्त आणि चांगले व्यक्तिमत्व सिद्ध करायचे झाल्यास “शिस्त” ही गोष्ट फारच महत्वाची असते.आणि उपयोगी पडते.ज्याच्या जीवनात शिस्त नाही,त्याचे जीवन केस विस्कटल्यासारखे विस्कटलेले असते.
अर्थात शिस्त ही बाह्यस्वरुपाची आणि आंतरिक पण असते,पण आंतरिक शिस्तीला बाह्यस्वरूप दिल्याशिवाय शिस्तीचे पालन होत नाही,शिस्त म्हणजे “नियमितता आणि नियोजन” होय. माणसाला कुटुंबाचे ,खर्चाचे नियोजन करावे लागते,आणि सरकारला समाजाचे आणि देशाचे नियोजन करावे लागते.भारताची पंचवार्षिक योजना म्हणजेच पाच वर्षात करावयाची कामे आणि त्यासाठी लागणारे बजेट म्हणजेच आर्थिक नियोजन होय.
व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग म्हणजे “वेळेला महत्त्व देणे,वेळेचे बंधन पाळणे” माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे,आपण केव्हाही आणि कधीही किंवा आताच मरू शकतो,आणि आयुष्यभर मर मर करून कमावलेली संपती पैसा अडका,घर दार इथेच सोडून जाते,उभ्या आयुष्यात जो व्यक्ती फक्त स्वतःसाठी आणि कुटुंबासाठीच जगला तो मरतो,आणि संसार करून इतरांच्या पण कामी आला,तो व्यक्ती मनानंतरही जिवंतच असतो.यासाठी समाजसेवेतील लोकांचे व्यक्तिमत्व उठून दिसते,तर स्वार्थी लोकांचे व्यक्तिमत्वाला लोकांचे दृष्टीने शून्य किंमत असते.
यासाठी आपला अमूल्य वेळ वाया घालविता कामा नये.वेळेचा सदुपयोग केला पाहिजे.ज्यांना वेळेची किंमत कळली नाही,ते जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत.
वेळेचे नियोजन पण महत्त्वाचे आहे.उदा.आपणास कुण्या समरभास,उदा.लग्न,मीटिंग,मेळावा,अशा कार्यक्रमास जायचे असल्यास त्याची वेळ पाहून, तिथे वेळेवर पोहचायचे झाल्यास सकाळची सर्व कार्यक्रम आटोपून घराबाहेर किती वाजता पडायचे? बस किंवा रिक्षा मिळेल का? त्यांची निघण्याची वेळ काय? ते नसतील तर पर्याय कोणता? कुठून कुठे जायचे? असे वेळेचे नियोजन केले पाहिजे.आणि कोणत्याही कार्यक्रमास वेळेवर पोहचणे आणि तेथील कार्यक्रमाच्या वेळेनुसार आपले वर्तन ठेवणे महत्वाचे आहे,असे करीत राहण्याने आपल्या जीवनाला एक शिस्त लागते,आणि जो वेळेचे पालन करतो,त्याचे व्यक्तिमत्व भारदस्त असते.
प्रभावी असते अन्यथा असा व्यक्तीला शिस्तच नाही,असा ठपका शिक्का लागतो,याने व्यक्तिमत्व बिघडते.म्हणून वेळेचे महत्व,वेळेचे नियोजन,वेळेचे पालन,या गोष्टी महत्त्वाच्या असतात.यासाठी माणसाला शिस्तप्रिय असणे जरुरीचे आहे.
याचा अर्थ शिस्त आणि व्यक्तिमत्व या दोन गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत,म्हणजेच ज्याला सद्गुणी व्यक्तिमत्व प्राप्त झालेले आहे,तो नक्कीच वेळेचे पालन करतो,आणि जो वेळेचे पालन करतो,त्याचेच व्यक्तिमत्व फुलते फळास येते.दुर्गुणी माणूस पण शिस्तप्रिय असू शकतो,परंतु तो दुर्गुणांचा वापर करीत असतो,म्हणून त्याचे व्यक्तिमत्व खुलत नाही, फळत नाही.समाज त्यास स्वीकारत नाही.
सारांश जीवनात वेळ,वेळेचे महत्व,वेळेची किंमत,वेळेचे नियोजन,वेळेचा सदुपयोग या गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळे प्रत्येकाने वेळेची कामे वेळेवर आणि ठरलेल्या वेळेतच केली पाहिजेत.



