दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : आषाढी पालखी सोहळा-२०२६ च्या नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू असल्याचे सांगत, वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.
त्या म्हणाल्या, दरवर्षी लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची, देहू येथून संत तुकाराम महाराजांची तसेच सासवड येथून संत सोपानकाका संस्थानची पालखी निघते. या ऐतिहासिक आणि पारंपरिक सोहळ्याला साजेसा तसेच वारकऱ्यांसाठी अधिक सुविधायुक्त अनुभव निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे.
बैठकीत पालखी प्रमुखांनी मांडलेल्या सूचना आणि अडचणींची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पालखी सोहळा विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि स्थानिक प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आणि समन्वय राहिल्यास सोहळा अधिक यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रित नियोजन करून वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पालखी सोहळ्यांशी संबंधित प्रमुख विश्वस्त, पालखी प्रमुख तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.



