दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
वढू : श्रीक्षेत्र वढू येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळास भेट देऊन महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी त्यांनी समाधी स्थळाच्या पवित्र भूमीस वंदन करत छत्रपती संभाजी महाराजांच्या राष्ट्रनिष्ठा व पराक्रमाची आठवण करून दिली.
यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी समाधी स्थळ परिसरात सुरू असलेल्या नूतनीकरण व विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. स्मारकाच्या बांधकामाबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कामाच्या दर्जाबाबत विशेष सूचना दिल्या. तसेच वारकरी, भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यावर त्यांनी भर दिला.
या प्रसंगी शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर कटके, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, भाजपा महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडी अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, मा.सभापती मंगलदास बांदल, मा.जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाधी स्थळाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाचा विचार करून आगामी काळात भव्य व आकर्षक स्वरूपात स्मारक उभारण्याचा संकल्प यावेळी मंत्र्यांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनीही स्मारकाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत शासनाच्या पुढाकाराचे स्वागत केले.



