शेखर इसापुरे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण अधिक प्रभावी व सुलभ करण्याच्या उद्देशाने येथील फ्युचर पोदार लर्न स्कूल साकोली या शाळेने आपल्या अधिकृत वेबसाईटची निर्मिती केली असून त्याचे भव्य लोकार्पण नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोदार एज्युकेशन नेटवर्क मुंबई चे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी रितेश रेड्डी उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका सौ.नमिता अजय तुमसरे होत्या. यावेळी प्राचार्य निकेशन देऊरमल्ले, समन्वयक राजीव समरीत, प्रेप समन्वयक गरिमा हरदेनिया, प्रशासन अधिकारी उमाकांत कमाने सह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते www.futurepodarsakoli.org या शाळेच्या वेबसाईटचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. शाळेचे संगणक विभागप्रमुख राजेश डुंभरे सर यांनी वेबसाइटची रचना, त्यातील विविध विभाग व सुविधा यांचे सादरीकरण केले.
या वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, ऑनलाईन नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, परीक्षा वेळापत्रक, निकाल तसेच शाळेतील विविध उपक्रमांची अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होणार आहे. तसेच पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रिया, बस सुविधा यासारख्या विविध प्रकारच्या सेवा फक्त एका क्लिकवर मिळणार आहेत.
प्रमुख पाहुणे रितेश रेड्डी सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डिजिटल शिक्षण ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाची दारे खुली होत आहेत.” त्यांनी शाळेच्या या पुढाकाराचे विशेष कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात संचालिका सौ.नमिता अजय तुमसरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची शालेय शिक्षणाला जोड देवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळा प्रयत्नशील आहे असा विचार बोलून दाखवला. प्राचार्य निकेशन देऊरमल्ले यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व भविष्यात अधिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व भविष्यात अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज बेलोदे तर आभार प्रदर्शन नितीन पोटफोडे केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



