प्रितम जनबंधु
संपादक
नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 60 व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित लावली होती. याप्रसंगी त्यांनी विदर्भाचा चेहरा बदलणार असल्याचे सांगितले. तसेच, भविष्यात गडचिरोली ‘स्टील सिटी’ म्हणून ओळखली जाईल असंही ते म्हणाले.
याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रवीण दटके, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, “जनतेच्या आशीर्वादाने मला ५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आज उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. विदर्भ आणि विदर्भातील उद्योगांच्या विकासासाठी शक्य तेवढे काम करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. व्यवसायात सुलभता आणणे, उद्योगांविषयीच्या समस्या सोडवणे आणि विविध प्रकारच्या पॅकेजच्या माध्यमातून विदर्भात गुंतवणूक कशी आणता येईल याकडे नेहमीच विशेष लक्ष दिले जात आहे.
याचबरोबर “महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर आणि विदर्भ हे नेहमीच विकासाचे केंद्र राहिले आहे. आज विदर्भात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असून भविष्यात गडचिरोली ‘स्टील सिटी’ म्हणून ओळखली जाईल. अमरावतीमध्ये अतिशय उत्तम टेक्सटाइल इकोसिस्टम तयार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे टेक्सटाईल पार्क तयार होत आहे. VIA सारख्या आघाडीच्या संस्थेची जबाबदारी मोठी आहे.” असंही फडणवीसांनी सांगितलं.
याशिवाय, “अलीकडे, माझ्या जपान भेटीदरम्यान, हे स्पष्ट झाले की तेथील उद्योगांना त्यांची गुंतवणूक चीनमधून हलवायची आहे आणि त्यांना भारतात गुंतवणूक करायची आहे. येत्या दशकात भारत हा ‘फॅक्ट्री ऑफ वर्ल्ड’ बनू शकतो. भारत आता लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.” असं फडणीस यांनी सांगितलं आहे.