क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात देवाचं स्थान:भाग्यश्री आत्राम… — आलापल्ली येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

आलापल्ली:क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी झारखंड, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले त्यामुळे बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात देवाचं स्थान असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

       क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आलापल्ली येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये आदिवासी उत्सव समिती तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अकनपल्लिवार, आदिवासी उत्सव समितीचे अध्यक्ष वशिल मोकाशी,

रेखचंद मेश्राम,राजेंद्र पेंदोर,पुरुषोत्तम गेडाम,वशील मोखाशी,रोशन कन्नाके,राकेश कन्नाके,शंकर येरमे,सौ ज्योती पेंदोर,विश्वनाथ कोवे,अनंत पेंदाम,मीना कुमरे,ग्रामपंचायत सदस्य सौ पुष्पा अलोने,लक्ष्मण येरावार,पराग पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

        पुढे बोलताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी. केवळ 24 व्या वर्षी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बिरसा मुंडांनी एक वेगळीच छाप उमटवली आहे.ब्रिटिशांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी आदिवासींच्या जंगलावर अतिक्रमण करायला सुरुवात केली. त्यावेळी आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी बिरसा मुंडा पुढे आले. आदिवासी अस्मिता, आदिवासी संस्कृती आणि स्वायत्तता यांच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतीचे हत्यार उचललं. त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी ‘उलगुलान’ चळवळ सुरु केली. त्या दरम्यान बिरसा मुंडा आणि ब्रिटिशांमध्ये अनेकवेळा चकमकी झाल्या. 

        शेवटी जानेवारी 1900 डोंबरीच्या पर्वतावर त्यांच्यामध्ये आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या चकमकीत त्यांना अटक करण्यात आली. या चकमकीदरम्यान अनेक स्त्रिया आणि बालकांचा मृत्यू झाला. ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांना तुरुंगात टाकलं आणि त्यानंतर तिथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.असे सांगून त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.