येचली येथील रेतीसाठा प्रकरणातंर्गत १४ जूनला जिल्हा कचेरी पुढे उपोषण.. – संतोष ताटीकोंडावार यांचा निवेदनातून इशारा..

 

डॉ.जगदिश वेन्नम

      संपादक 

गडचिरोली :-भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम येचली येथील नदी घाटातून एकाही रेतीची उचल न करता येथील वाहतूक परवाना दाखवून अनेक नवनिर्माणाधिन कामे करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. 

       यात बनावट दस्ताऐवजाचा आधार घेत रेतीचा अवैध साठा करुन शासनाच्या कोट्यावधी महसूलाला चुना लावण्यात आला. या प्रकरणी तक्रार करुनही दोषी अधिका-यांसह संबंधित कंत्राटदारावर कारवाई न झाल्याने 14 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनातून दिला आहे.

      निवेदनात ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की,येचली येथील इंद्रावती नदीघाटातून रेतीची उचल न करताच येथील टिपी (वाहतूक परवाना) दाखवून भामरागड व अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिकन बांधकामात येथील रेतीचा वापर करण्यात आले होते. 

       तसेच अवैधरित्या रेतीचा साठाही करण्यात आला होता.सदर प्रकारात बनावट दस्ताऐवजाच्या आधार घेत शासनाच्या कोट्यावधी रुपयाला चुना लावण्यात आला. याप्रकरणी तक्रार करताच भामरागड तहसिलदारांनी 563 ब्रास अवैध रेती साठा प्रकरणी दंडात्मक कारवाई केली होती.

        मात्र या प्रकरणात महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकारी वा कर्मचा-यावर कारवाई न झाल्याने संतोष ताटीकोंडावार यांनी प्रारंभ उपविभागीय पोलिस अधिकारी, त्यानंतर विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे तक्रार करीत वरिष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र सदर प्रकरण थंडबस्त्यात गेल्याने ताटीकोंडावार यांनी थेट राज्यपालांकडे निवेदनातून सदर प्रकरण अवगत करीत कारवाई करण्यासंदर्भात आदेश देण्याची विनंती केली होती.

        मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणी कुणावरही कारवाई न झाल्याने न्याय मागणीला घेऊन 14 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण छेडण्याचा इशारा भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचेमार्फत जिल्हाधिका-यांना निवेदनातून दिला आहे.