लग्न ठरलेल्या मुहूर्तावर लागेल त्यांना रोख 25 हजार 555 रुपयांचे बक्षीस… — सुस येथील ‘सनिज वर्ल्ड’ रिसॉर्ट सह मंगल कार्यालयाचा अनोखा उपक्रम…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

पुणे : सध्या लग्नसराईत बहुतेक ठिकाणी लग्न वेळेत लागत नाहीत. मुहूर्ताची वेळ लक्षात ठेऊन लोक लग्नाला येत असतात. आपण वेळ चुकवली की सगळ्यांची गैरसोय होते. याचा विचार करून लग्नाची वेळ पाळण्याचे ठरवले पाहिजे. लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वेळेचे महत्व निमंत्रितांना जाणले पाहिजे. वेळात वेळ काढून, लांबचा प्रवास करून आलेल्या आप्तेष्टांना वेळेत सोहळा उरकून त्यांच्या पुढच्या कार्यासाठी पाठवणे ही मोठी जबाबदारी निमंत्रकांची असते.

        मात्र अनेक कारणांमुळे लग्नाचा मुहूर्त साधला जात नाही. त्यामुळे वेळेत लग्न लावणे हल्ली अत्यंत गरजेचे बनले आहे.

         सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. दररोज नातेवाईक, मित्र परिवारात कुठे ना कुठे तरी लग्न समारंभ असतोच. अलीकडे बहुतांश लग्न संध्याकाळची असतात. साधारणपणे सहा ते सातच्या दरम्यान या लग्नांचा मुहूर्त असतो. पण तो सहसा पाळला जात नाही. त्यामुळे लग्न लागण्यास आठ ते साडेआठ वाजतात. मुहूर्ताची वेळ पाळली नाही तर सगळ्यांच्याच वेळेचे गणित बिघडते. आलेल्या पाहुणे मंडळींना इतर ठिकाणी लग्नास किंवा पुर्वनियोजित कार्यक्रमाला जायचे असेल तर ते नियोजन कोलमडून जाते. मंगल कार्यालयांमध्ये दररोज लग्न समारंभ असतात. त्यामुळे आदल्या दिवशीचा सोहळा लांबला तर त्याचा दुसऱ्या दिवशीच्या सोहळ्यावर निश्चितपणे परिणाम पडतो.कुटुंबसंस्थेवर आपली समाजरचना आहे. भारतीय संस्कृतीत विवाहाला अनन्यसाधारण महत्व आहे. काळाच्या ओघात ‘संस्कार ते समारंभ’ अशी लग्नाची संकल्पना बदलत गेली. लग्नात मुहूर्ताला महत्व आहे. लग्न मुहूर्त असला तरच तो दिवस लग्नासाठी ठरवला जातो. मग सगळ्या बाबी त्याभोवती जुळवून आणल्या जातात. परंतु दुर्दैवाने अनेक लग्नात मुहूर्ताची वेळच पाळली जात नाही. मुहूर्तावर लग्न लावण्याचे धार्मिक महत्व देखील सांगितले जाते.

          वेळेत लग्न लावणाऱ्यांसाठी पुण्यातील सनिज वर्ल्ड’ने अनोखी उपक्रम मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे सुस गाव येथे ‘सनिज वर्ल्ड’ रिसॉर्ट सह मंगल कार्यालय आहे. सनी निम्हण यांनी त्यांच्या कार्यालयात लागणाऱ्या लग्नांमध्ये जे लग्न ठरलेल्या मुहूर्तावर लागेल त्यांना रोख 25 हजार 555 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे बक्षीस ठेवून अद्याप संपूर्ण महाराष्ट्रात सनिज वर्ल्ड’ने आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.