भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
सन 2010 ते 2012 या सत्रात कै.महेश सावकार पोरेड्डीवार अध्यापक विद्यालय, धानोरा जिल्हा गडचिरोली मधून शिक्षकी पेशाचे धडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे दिनांक 8 व 9 मार्च 2025 रोजी किसान भवन धानोरा याठिकाणी वर्गमित्र स्नेहमिलन (गेट टुगेदर) सोहळा संपन्न झाला असून तब्बल 13 वर्षांनी हे सर्व मित्र मैत्रिणी याप्रसंगी एकत्र जमले होते.
8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यास सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकी पेशाचे धडे देणारे शिलार सर, थोटे सर, बोरकर सर आदी अध्यापक वृंद उपस्थित झाले.
याप्रसंगी उपस्थित सर्व अध्यापक वृंदाचे शाल श्रीफळ पुषगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले. त्यानंतर वर्ग मित्रांचे मनोगत तसेच शिक्षकांचे मनोगताच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा ताजे करण्यात आले.
या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध ठिकाणाहून वर्गमित्र आपल्या परिवारासह एकत्र जमले असून, सर्व वर्गमित्र आणि त्यांच्या लहान चिमुकल्यांना भेटवस्तू देण्यात आले. विविध खेळ, डान्सच्या माध्यमातून सर्वांनी या प्रसंगाचा मनसोक्त आनंद लुटला.
“पुन्हा एकदा…. एक दिवसाची शाळा, तेच मित्र, तीच मौज…. जुन्या मस्तीत, नव्या ढंगात , चला एकत्र रमुया…. आपण पुन्हा एकत्र जमूया” म्हणत सर्व मित्र मैत्रिणींनी गेट टुगेदर या सणाचा प्रत्येक क्षण आनंदात साजरा केला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा आपापल्या घरी परतण्याची वेळ आली तेव्हा मात्र सर्व शिक्षक वृंद आणि सर्व मित्र मैत्रिणी यांना आपले अश्रू थांबविता आले नाही आणि भिजलेल्या डोळ्यांनी सर्वांनी या कार्यक्रमातून निरोप घेतला.



