वारी कालावधीत भाविकांना सुलभ दर्शन घडावे, यासाठी मंदिर समितीने आवश्यक नियोजन करावे.:- पालकमंत्री विखे पाटील यांची सुचना… —  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मंदिर परिसराची पाहणी…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पंढरपूर : पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, शहर व परिसरात भाविकांना देण्यात सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मंदिर व परिसर, महाद्वार चौक, नदीपात्र, पत्रा शेड, 65 एकरची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्र.जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, अतिरीक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी आदिंसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

      आषाढी वारीमध्ये प्रथा परंपरेप्रमाणे पादुका स्नानाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने महाद्वार घाटावरून नदीपात्रात या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पोलीस प्रशासनाने घाटावरील गर्दीचे योग्य नियोजन करावे. तसेच महाद्वार घाटावरील अडथळादायी वायर्सच्या पार्श्वभूमिवर आवश्यक ती दक्षता घ्यावी. मंदिर परिसरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत, जेणेकरून भाविकांना अडथळा येणार नाही, असे ते म्हणाले. चंद्रभागा नदीपात्रातील पाणी स्वच्छ रहावे, यासाठी आषाढी एकादशीपूर्वी 7 दिवस पाणी सोडण्याच्या सूचना संबंधितांना करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, चंद्रभागा नदी पात्रातील खड्डे बुजवावेत. नदी पात्रात धोक्याच्या ठिकाणी बॅरिगेट्स तसेच धोक्याच्या ठिकाणाची माहिती देणारे फलक लावावेत. नदीपात्र वेळोवेळी स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले. 

      मंदिराभोवती पत्र्याचा निवारा शेड करण्याच्या, आवश्यकतेनुसार पंखे लावण्याच्या सूचना करून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले दर्शन रांग अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने गरजेनुरूप खाजगी जागेवर मांडव उभा करून भाविकांची व्यवस्था करावी व त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात. दर्शन रांगेत गर्दी न करता मोकळे वातावरण राहील याबाबतची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

       वारी कालावधीत भाविकांना सुलभ दर्शन घडावे, यासाठी मंदिर समितीने आवश्यक नियोजन करावे. दर्शन रांग व दर्शन मंडपात स्वच्छता राखावी तसेच मॅटची व्यवस्था करावी. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे सांगून विखे पाटील यांनी गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पत्राशेडच्या ठिकाणी मोकळ्या जागेत मंडप उभा करावा, यामुळे वारकरी भाविकांबरोबरच अधिकारी, कर्मचारी, भोजन व्यवस्था देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सावली मिळेल, शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच त्याठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या. 

       यंदा प्रथमच मानाच्या पालख्यांसमवेत नव्याने येणाऱ्या दिंड्यांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड होऊ शकते, त्यामुळे अनोंदणीकृत पालख्या व दिंड्यांनी मंदिर संस्थानकडे नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

       आपण संपूर्ण पालखी मार्ग व तळाची पाहणी केली असून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर, पुणे आणि सातारा अशा तिन्ही जिल्ह्यातील पालखी मार्गावर चांगल्या व्यवस्थेचे नियोजन झाले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.