महिलांच्या विकासाकरीता पुढाकार घेत असलेल्या १४४ जणांचा “सुधारक सन्मान”…. — जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते तिघांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान…

डॉ.जगदीश वेन्नम

    संपादक

गडचिरोली, दि.०९ : महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नव तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत जेंडर व न्यूट्रीशन या घटकाकरीता वर्ष 2022-23 वर्षाच्या योजनाप्रमाणे “Gender Sensitive Role Model Award” या लेखाशीर्षांतर्गत महिला सक्षमीकरणाकरीता संवेदनशील व गावपातळीवर महिलांच्या विकासाकरीता पुढाकार घेत असलेल्या पुरूषांचा सत्कार करण्याचे नियोजित होते. या अंतर्गत जिल्ह्यातील 144 जणांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचा मूळ हेतू म्हणजे गावस्तरावर “Men Gender Sensitive Role Model” तयार होणे व महिला सक्षमीकरणाकरीता पुरक वातावरण तयार करणे, हा आहे. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी महिलांचे हक्क व अधिकार यासाठी लढा दिला. महिलांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे हक्क व शिक्षणाची संधी मिळवून देण्यास क्रांतिकारक काम केलेले आहे. या दोन महापुरुषांच्या कार्याची प्रसिध्दी जगभर आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांची दि. ११ एप्रिल २०२३ रोजी १९६वी जयंती व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची दि. १४ एप्रिल २०२३ रोजी १३२ वी जयंतीनिमित्ताने एप्रिल महिन्यात महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा “Gender Sensitive Role Model” म्हणून “ सुधारक सन्मान” हा उपक्रम हाती घेण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या अनुशंगाने महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली अंतर्गत संचालित लोकसंचालीत साधन केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावस्तरीय समिती अध्यक्ष, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका व सदस्य सचिव सहयोगिनी यांची समिती गठीत करुन 48 पुरुषांची निवड करुन तालुकास्तरावरील लोकसंचालीत साधन केंद्रास पाठविण्यात आले. द्वितीय स्तरावर तहसलीदार समिती अध्यक्ष, बीडीओ, पोलिस इन्सकपेक्ट, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी समिती सदस्य यांच्या मार्फत 24 पुरुषांची निवड करण्यात आली. तालुकास्तरावर अंतीम निवड केलेल्या 24 पुरुषांचा “सुधारक सन्मान” सत्कार करुन पुरस्कार देण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातील 24 निवड केलेल्या पुरुषांपैकी 3 निवडक पुरुषांची शिफारस जिल्हास्तरीय समितीकडे करण्यात आली.

त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व सदस्य नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा स्तरीय महिला समिती सदस्य तथा सदस्य सचिव जिल्हा समन्वय अधिकारी यांची समिती मार्फत जिल्हा स्तरावर प्राप्त झालेल्या 6 तालुक्यातील 18 पुरुषांपैकी 3 पुरुषांची सत्काराकरीता निवड करण्यात आली. संजय मीणा (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे हस्ते बंडू करकाडे, कळमटोला, सखी सीएमआरसी गडचिरोली, कैलास तुकाराम रहाणे, कोंढाळा, तेजोमय सीएआरसी वडसा व विनोद धारगावे वैरागड, जिवनज्याती सीएमआरसी वैरागड या निवड केलेल्या 3 पुरुषांना “सुधारक सन्मान पुरस्कार” प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अरविंद टेंभूर्णे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा मानव विकास समिती, गडचिरोली डॉ. सचिन देवतळे, जिल्हा समन्वय अधिकारी, माविम जिल्हा कार्यालय, गडचिरोली हे होते. सत्कार कार्यक्रमास सतीश प्रधान, लिपीक सहाय्यक, माविम, गडचिरोली, तुषार सोमनकर, माविम घर व्यवस्थापक, माविम, गडचिरोली, श्रीमती कुंदा मामीडवार, व्यवस्थापक, तेजोमय सीएमआरसी, वडसा, सुरेश बावणकर, लेखापाल, जिवनज्योती सीएमआरसी वैरागड व ईतर मान्यवर उपस्थित होते.