निधन वार्ता… — शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख ॲड.अविनाश रहाणे यांचे निधन…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पुणे : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक व मंचर येथील शिवकल्याण पतसंस्थेचे संस्थापक माजी जिल्हाप्रमुख ॲड.अविनाश तुकाराम रहाणे (वय ५७ वर्षे ) यांचे रविवारी (दि.८) सकाळी भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नात असा परिवार आहे.

       उत्तर पुणे जिल्ह्यात विशेषतः आंबेगाव तालुक्यात शिवसेना रुजविण्यात व वाढविण्यात अविनाश रहाणे यांचा मोलाचा वाटा होता. या भागात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम सुरवातीपासूनच अविनाश रहाणे यांनी हिरारीने केले होते. शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतीने शिवसेनेत अगदी शाखाप्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणून ४० वर्षे त्यांनी काम केले.

         आंबेगाव तालुक्यात अविनाश रहाणे यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेने चांगली कामगरी केलेली होती. या सर्व कामांचे बक्षिस म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने सन १९९९ व सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अविनाश रहाणे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यात १९९९ मध्ये तर त्यांचा निसटता पराभव झाला होता. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये अविनाश रहाणे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.