माणसाच्या फक्त दोनच गरजा आहेत.
1) शारीरिक सुख…
2) मानसिक समाधान…
शारीरिक सुख म्हणजे भौतिक सुख आणि शरीर संरक्षण,आणि मानसिक समाधान म्हणजे आंतरिक सुख आणि मनाची स्थिरता,शरीराचे संरक्षण आणि मनाचे शिक्षण,याची गरज,शारीरिक आचरण आणि मनाला संस्कार या दोन गोष्टींचीच माणसाला गरज आहे.या दोन गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस अनेक खटपटी अन लटपटी जीवनभर करीत असतो.
शारीरिक सुख आणि संरक्षणासाठी अन्न वस्त्र निवारा आरोग्य या मुलभूत सुविधा निर्माण करणे ही त्याची गरज बनते.त्यासाठी किंवा या मिळवण्यासाठी माणूस नोकरी कामधंदा करतो चार पैसे कमवितो,आणि जसे कमी अधिक पैसे मिळतील त्यानुसार त्याची अन्न वस्त्र निवारा आरोग्य याचा दर्जा चे सुख त्यास मिळते.म्हणजेच कमी पैसे मिळाले तर अन्नाचा दर्जा,वस्त्राचा दर्जा, घराचा दर्जा,आरोग्य सुविधांचा दर्जा कमी असतो.जास्त पैसे मिळाले तर या शारीरिक गरजांचा दर्जा यात सुधारणा होते.उच्च दर्जा मिळते.त्यानुसार त्याची समाजात इज्जत प्रतिष्ठा पण त्या त्या व्यक्तीला मिळते.याचा अर्थ माणसाची आर्थिक परिस्थिती काय आणि कशी? म्हणजे तो गरीब मध्यम श्रीमंत या वर्गांपैकी कोणत्या वर्गाचा आहे,त्या वर्गानुसार त्याचे स्थान आणि त्याची शारीरिक गरज,भौतिक गरज,शरीर संरक्षण होत असते.अर्थात गरीब मध्यम श्रीमंत हे वर्ग निर्माण होणे,किंवा करणे हे सरकारच्या हाती असते,म्हणजे सरकारचे आर्थिक बजेट आणि आर्थिक नियोजन हे गरीबी हटवण्याचे आहे,की श्रीमंती वाढवण्याचे आहे? यावरून गरीब मध्यम श्रीमंत हे तीन वर्ग पडतात,आणि त्यातील अंतर किती कमी जास्त करायचे किंवा ठेवायचे हे सरकारी आर्थिक धोरण आणि नियोजन आणि मंत्र्यांचे आर्थिक विचार (आर्थिक समतेचे की विषमतेचे ) यावर अवलंबून असते.हे जनतेने (विशेषतः मतदारांनी) लक्षात घेणे जरुरीचे आहे.
माणसाला गरीबी श्रीमंती या अवस्थेतून जावे लागते,त्यानुसार त्याच्या भौतिक सुविधा त्यास मिळतात,म्हणजेच माणसाच्या आर्थिक वर्गांनुसार त्यास त्याला भौतिक सुविधा मिळतात.आणि त्याला मिळणाऱ्या भौतिक सुविधा ( गरजा पूर्ती ) त्यानुसार त्याचे शारीरिक सुख पूर्ण किंवा अपूर्ण होत असते.
शारीरिकसुख आणि शरीरसंरक्षण हे त्याचा आर्थिक वर्ग कोणता ( गरीब मध्यम श्रीमंत ) यावर अवलंबून असते.आणि शरीरसुखावर मानसिकसुख अवलंबून असते.याचा अर्थ माणसाला शारीरिक सुख आणि संरक्षण नसेल तर माणसाची मानसिक अवस्था बिघडते,विचलित होते,म्हणजे स्थिर राहत नाही,मग मन स्थिर करण्यासाठी माणूस देव दैव धर्म गुरू याचा आधार शोधतो.कारण यांच्यामुळे मन स्थिर राहते,असे शिक्षण माणसाला मिळत असते,जे चुकीचे असते,खोटे असते,बुद्धी भ्रमिष्ट करणारे असते.चमत्कार,जादू,अंधश्रद्धा याचे ते शिक्षण असते.याने माणसाचे मन कधीच स्थिर होत नाही.माणसाचे मन स्थिर करण्याचे कारण देव दैव धर्म कर्मकांड तीर्थाटन पापपुण्य हे नसते,तर माणसाला जो पर्यंत शारीरिक सुख आणि संरक्षण मिळत नाही,तो पर्यंत माणसाच्या मनाच्या अस्थिरतेची गती कमी होत नाही.तसे मुळात मनाची अवस्थाच ( गुण ) अशी असते की,मन हे कधीच आणि काहीही केले तरी ते स्थिर होत नसते,फक्त त्याची गती कमी जास्त करता येते.म्हणून मनाची गती कमी करायची,त्याचा अविचलितपणा कमी करायचा असेल तर त्यासाठी देव धर्म कर्म हे उपयोगी नसतात,तर त्याचा आर्थिक स्तर सुधारणे गरजेचे आहे.त्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे.
आता प्रस्न निर्माण होईल की,ज्याची आर्थिक स्थिती संपन्न आहे,जे श्रीमंत आहेत,ते मनाने का स्थिर नाहीत ? याचे कारण तथागत गौतम बुद्धाने सांगितले,संतानी सांगितले ,ते हे की,प्राथमिक गरजा भागविण्या एव्हढे माणसाने स्वार्थी असले पाहिजे,पण त्यानंतरचा स्वार्थ म्हणजे हाव,आशा,अभिलाषा,हावरटपणा, लोभीपण हे आहे.यामुळे मन स्थिर राहत नाही.म्हणजेच गरिबांचे मन स्थिर होत नाही याचे कारण त्याचा वर्ग,आणि श्रीमंतांचे मन स्थिर होत नाही याचे कारण त्याचा हावरटपण.ओरबाडून खाण्याची वृत्ती,मोह.शोषण करण्याचे त्यांचे विचार.
याचा अर्थ माणूस गरीब असो की श्रीमंत त्याचे मन स्थिर किंवा अस्थिर होण्याचे कारण हे देव धर्म दैव कर्मकांड पूर्वीच्या जन्माचे पापपुण्य हे नसते.तर त्याची परिस्थिती आणि विचार वृत्ती हे असते.ही गोष्ट इथे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
थोडक्यात,शारीरिक सुख आणि संरक्षण ही माणसाची भौतिक गरज आहे,ती पूर्ण झाली पाहिजे,आणि मानसिक अस्थिरतेची गती कमी करण्यासाठी शिक्षण ही माणसाची गरज आहे,ती पूर्ण झाली पाहिजे.



