आरमोरी पंचायत समितीची वार्षिक आमसभा विविध विषयांवर गाजली… — सर्व समस्या निकाली काढा अधिकाऱ्यांना आमदार गजबे यांचे निर्देश….

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी -तालुक्यातील सर्व विभागाकडे असलेल्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्नशील राहून, आमसभेत जनतेतून आलेले सर्व प्रश्न समस्या यांची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन जनतेच्या समस्या तात्काळ निकाली काढाव्यात, असे निर्देश आमदार कृष्णा गजबे यांनी दिले. 

       आरमोरी पंचायत समितीची सन२०२२-२३ या वर्षाची वार्षिक आमसभा आरमोरी येथील तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय भवनसभागृहात घेण्यात आली यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

      कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, आरमोरी तहसीलचे प्रभारी तहसीलदार ललीतकुमार लाडे ,नायब तहसीलदार वाकुडकर,सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी अशोक कुर्झेकार, आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, आरमोरी न. प.चे प्रभारी मुख्याधिकारी हरिदास दोनाडकर,नगराध्यक्ष पवन नारनवरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सदानंद कुथे, कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीचे सभापती ईश्वर पासेवार,आरमोरी प.स.च्या माजी सभापती नीता ढोरे,आरमोरी न.प.चे आरोग्य सभापती भारत बावनथडे बांधकाम सभापती सागर मने, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी,भाजपाचे आरमोरी तालुका अध्यक्ष नंदू पेट्टेवार,भाजपा महिला तालुकाध्यक्ष डाँ.संगीता रेवतकर, भाजयुमोचे आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, आरमोरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

     आमसभेची सुरवात राज्य व राष्ट्रगीताने,व भारतीय संविधान वाचून सुरू करण्यात आली.

       सर्वप्रथम आरमोरी पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी मडावी यांनी मागील वार्षिक आमसभा अहवालाचे वाचन केले.

सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी सभेत सांगितले की, आरमोरी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बोबडे हे,नागरिकांच्या समस्या जाणून न घेता,तालुक्यातील काही सरपंचांना असभ्य बोलतात. .असे सांगितले असता आरमोरी तालुक्यातील नागरिकांनी वीज वितरण संदर्भात अनेक तक्रारींचे आ.गजबे यांचे समोर गाऱ्हाणे मांडले. यावेळी आ.गजबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून जनतेचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. अशोक माकडे यांनी वघाळा या गावाचे मागील २५ वर्षांपासून सीमांकन का करण्यात आला नाही असा जाब विचारला असता, गजबे यांनी तात्काळ सीमांकन करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.झाडे यांनी सांगितले की, अरसोडा येथील पटाच्या दानिवर बाहेरील व्यक्तींनी अतिक्रमण केलेले असून,भूमी अभिलेख विभागाने आखीव पत्रिका कशी काय दिली? त्याची चौकशी करण्यात यावी असे सांगितले असता,गजबे यांनी सदर ठराव पारित करून चौकशीचे आदेश दिले. निखिल धार्मिक यांनी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँक तयार करण्यात यावी असे सांगितले असता सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला.

          आरमोरी तालुका अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरणे गरजेचे असून सदर रिक्त पदे भरण्यासंदर्भाने आजच्या आम सभेचे संदर्भ देऊन कार्यालय प्रमुख यांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात यावा असे गजबे यांनी सांगितले. आरमोरी, कासवी, आष्टा , अरसोडा, रवी, मुलुंर चक या परिसरात सध्या वाघाची दहशत असून नागरिकांकडून सदर क्षेत्रास बफर झोन करण्यात यावी अशी सभागृहामध्ये मागणी करण्यात आलेली आहे, परंतु सदर क्षेत्र बफर झोन केल्यास क्षेत्रातील नागरिकांना भविष्यामध्ये खूप अडचणीचा सामना करण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे सदर क्षेत्र बफर झोन करणे ऐवजी वनालगतच्या शेती करिता जाडीचे मोठे कुंपण तयार करून मिळणे बाबतचा प्रस्ताव कृषी विभागाकडून वन विभागाकडे सादर करण्यात यावे असे आदेश गजबे यांनी दिले. पंचायत समिती आरमोरीची नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करणेकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला असून मंत्रालयात आपण पाठपुरावा केला असल्याचे गजबे यांनी सांगितले. तसेच वार्षिक आमसभेला अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांवर शोकांत नोटीस देण्यात यावे,मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, विकासकामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही गजबे यांनी सांगितले.

          याखेरीज आरमोरी तालुक्यातील मुलूरचक हे गाव जंगलालगत असल्याने हिंस्त्र प्राण्यांची नेहमीच दहशत असते त्यामुळे गावात पथदिवे लावण्यात यावे,वघाळा शिवणी रोडचे डांबरीकरण करण्यात यावे, आरमोरी येथील खरेदी विक्री संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, भूमिअभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी,तालुक्यातील सर्व जी.प.च्या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे,रवी मुलूरचक या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी,आरमोरी तालुक्यातील सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी,जोगीसाखरा ते वैरागड मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे,पाथरगोटा गावाला स्मशानभूमीसाठी जागा देण्यात यावी, आरमोरी शहरात नवीन पाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वीत करण्यात यावी,आवास योजनेंतर्गत दिव्यांग, विधवा यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, आरमोरी येथील रामसागर तलावाजवळ असलेली घाणीची स्वछता करण्यांत यावी,वाघळ, सायगाव,शिवणी या गावांना इतियाडोह चे पाणी देण्यात यावे,आरमोरी शहरातील डोंगरी,इंदिरा नगर,काळगोटा या भागातील नागरिकांना आखीव पत्रिका देण्यात याव्या, पालोरा येथील पांदण रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे,आरमोरी शहरातील प्रत्येक वार्डात व मार्गावर सि सि टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे,धडक सिंचन विहिरीचा व अकुशल कामाचा कामाचा उर्वरित निधी देण्यात यावा,किटाळी -सुर्यडोंगरी-देलोडा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, आरमोरी येथील किनारा हॉटेल ते अरसोडा स्मशानभूमी,शंकरनगर ते मंजेवाडा, सालमारा ते शंकरनगर रस्त्याचे काम करण्यात यावे, शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज मीटर तात्काळ देण्यात यावे,कृषिपंपाच्या मीटरची रिडींग न घेता बिल देणाऱ्या अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी,नगरपरिषद अंतर्गत नित्कृष्ठ रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्रातदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, आरमोरी शहरातील घरकूल धारकांना नमुना ८ नुसार घरकुल बांधकामाची मंजुरी देण्यात यावी,शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील घरकुलच्या निधीत वाढ करण्यात यावी, वाघाचा धुमाकूळ असलेल्या क्षेत्रात व्याघ्र संरक्षण दलाची निर्मिती करण्यात यावी,अशा अनेक समस्या नागरिकांनी आमसभेत मांडून मागणी केली. यातील बहुतांश ठराव आमसभेत मंजूर करण्यात आले असल्याचे गजबे यांनी सांगितले.

        तसेच १००% करवसुली करणाऱ्या आरमोरी तालुक्यातील सुकाळा, शिवणी(बु.)नरचुली या तीन ग्रामपंचायतीच्या तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मानापूर, ठाणेगाव, सुकाळा व घरकुल योजनेअंतर्गत उत्कृष्ठ बांधकाम उद्दीष्ट पार केलेल्या मोहझरी, डोंगरसावंगी, कुरंडी माल आदी ग्रामपंचायतच्या सरपंच / सचिव यांना आ.गजबे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करन्यात आले.

       वार्षिक आमसभेचे संचालन राजू वडपल्लीवार, प्रास्ताविक सहाययक संवर्ग विकास अधिकारी अशोक कुर्झेकार, अहवालवाचन सांख्यिकी विस्तार अधिकारी मडावी तर आभार पंचायत विस्तार अधिकारी राजकुमार पारधी यांनी मानले. वार्षिक आमसभेला सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी,पत्रकार, सरपंच, उपसरपंच, सदस्य,शेतकरी, नागरिक, तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.