राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली :- ग्राम वीज सेवक संघटना व कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी ०४ फेब्रुवारी २०२६ पासून महावितरणच्या प्रशासकीय भवनासमोर, गडचिरोली येथे घेरावा आंदोलन सुरू आहे. पेसा कायद्यातर्गत कार्यरत ग्राम वीज सेवक व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला. मानधनवाढ, करारवाढ, थकीत वेतन तसेच विमा संरक्षण या प्रमुख मागण्यांवर तात्काळ लेखी निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
“राज्याचे मुख्यमंत्री हेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून ऊर्जा विभागाचा संपूर्ण कारभार त्यांच्या अखत्यारित आहे. असे असतानाही पेसा कायद्यातर्गत कार्यरत ग्राम वीज सेवक व कंत्राटी तांत्रिक कामगारांवर सातत्याने अन्याय, शोषण व दुर्लक्ष होत असून, ही बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
“ग्रामीण व दुर्गम भागात प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या या कामगारांच्या मेहनतीवर संपूर्ण वीज व्यवस्था उभी आहे. मात्र तुटपुंज्या मानधनावर, विमा व शासकीय संरक्षणाशिवाय काम करण्यास त्यांना भाग पाडले जात आहे, हे सत्ताधारी सरकारचे अपयश आहे.” या अन्यायाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनास काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून ग्राम वीज सेवक व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
प्रशासनाने त्वरित या संदर्भात निर्णय जाहीर न केल्यास, येत्या काळात अधिक तीव्र, व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी गडचिरोली ता.अध्यक्ष वसंत राऊत, दिवाकर निसार, राजेशभाऊ ठाकूर, विजयभाऊ लाड, प्रभाकर नरोटे, गजानन परचाके, पवन आत्राम, राजन बांबोळकर, विवेक तोटेपल्लीवार, भोजराज वैदय, सुरेश रोहणकर, निलद भोयर, विनोद कावरे, सौरभ टेम्भूर्णे सह इतर आंदोलन कर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



