Home Social घोडपेठ बसथांबा येथे एस.टी. बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल… — अधिकृत...

घोडपेठ बसथांबा येथे एस.टी. बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल… — अधिकृत सूचनांचे उल्लंघन हा गंभीर प्रकार…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर–नागपूर मार्गावरील घोडपेठ बसथांबा येथे सर्व सामान्य व सुपर एस.टी.बसेस थांबविण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,चंद्रपूर आगाराकडून अधिकृत सूचना देण्यात आलेल्या असतानाही प्रत्यक्षात या सूचनेचे पालन होत नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.

            दिनांक 04 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनेनुसार घोडपेठ येथे प्रवासी व विद्यार्थ्यांची सुरक्षित चढ-उतार करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही अनेक बस चालक व वाहक बस न थांबविता पुढे जात असल्याने स्थानिक नागरिक,विद्यार्थी,महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

             या संदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले.यावेळी गावातील मंजुषा खारकर,वर्षा खारकर,सुनीता भेंडाळे,शंकर खारकर,गीतेश भोयर,विशाल धारावत तसेच स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           यावेळी बोलताना इंजि.जगदीश भाऊ लवाडिया यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की,“शासनाने दिलेल्या लेखी सूचनांचे जाणीवपूर्वक उल्लंघन होत असेल,तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर व बस चालकाशी–वाहकांवर निश्चितच येते.

          प्रवाशांची सुरक्षितता हा कोणताही प्रयोगाचा विषय नसून,विशेषतः विद्यार्थी,महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही.प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून घोडपेठ बसथांबा येथे सर्व बसेस नियमित थांबतील याची हमी द्यावी.”

          या प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवित व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून सूचनेचे पालन न करणाऱ्या चालक व वाहकांवर र.प. महामंडळाच्या नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी,तसेच घोडपेठ बसथांबा येथे स्पष्ट सूचना फलक/बॅनर लावण्यात यावेत,अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.

           प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागेल,असा इशाराही यावेळी उपस्थितांनी दिला.