ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली – वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था, नागपूर संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, साकोली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर प्राचार्य डॉ. चतुर्वेदी यांनी विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्य व विचारसरणीविषयी सविस्तर माहिती दिली. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वांत प्रभावी शस्त्र आहे. शिक्षक हे ज्ञान, संस्कार, शिस्त आणि नैतिकतेचे धडे देऊन विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करतात तसेच करिअरची योग्य दिशा दाखवतात.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्या भविष्याचा पाया रचण्याचे कार्य शिक्षक करतात. शिक्षक हे मार्गदर्शक, प्रेरणादायी आदर्श असून ते विद्यार्थ्यांची क्षमता, आवड व योग्यता ओळखून त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावतात. आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षक हा केवळ अध्यापक न राहता पालक, नेता, कलाकार, शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सल्लागार व निष्पक्ष निर्णायक अशा विविध भूमिका पार पाडतो, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निरज अतकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन पुखराज लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अजय कांबळे, डॉ. राजश्री, डॉ. संदीप भगत, डॉ. राकेश शेजवाल, डॉ. सुनील कापगते, डॉ. सुनील अकोलेरकर, शिवानी पवार, साहिद सय्यद, रश्मी टिकेकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.



