शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 9 जुलैला देशस्तरावरील कामगार-कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. महाराष्ट्रात या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तसेच राज्यस्तरावरील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय कामगार-कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूर च्या वतीने 21 मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करुन घेण्यासाठी बुधवार, दिनांक 9 जुलै 2025 ला चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत दोन तास “वॉक आऊट आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तत्काळ जारी करण्यात यावी, एकवेळची बाब म्हणून प्रतिक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या द्याव्यात, खुल्लर समितीचा अहवाल तत्काळ प्रसिध्द करणे, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दि. १ जानेवारी २०२५ पासून २ टक्के महागाई भत्तावाढ मंजूर करणे, चंद्रपूर जिल्ह्यातील 9 तालुक्यामध्ये नक्षलग्रस्त व आदिवासी क्षेत्रातील लाभ सुरू ठेवण्याबाबत आदीं प्रलंबित मागण्या तसेच इतर 16 मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवार, दिनांक 9 जुलै 2025 ला चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत दोन तास “वॉक आऊट” आंदोलन होणार आहे.
उपरोक्त जिव्हाळयाच्या प्रलंबित मागण्यांसाठी या दोन तास “वॉक आऊट” आंदोलनास जिल्हा तथा तालुकास्तरावरील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परीषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, नगर परिषद-नगर पंचायत कर्मचारी, तसेच इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून आपल्या हक्क व अधिकारासाठी लढा द्यावा असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, सरचिटणीस राजु धांडे, कार्याध्यक्ष संतोष अतकारे व अविनाश बोरगमवार, कोषाध्यक्ष श्रीकांत येवले तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अशोक टेप्पलवार यांनी केले आहे.



