युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- नजिकच्या कान्होली गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईने प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उभे केले जात आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी रोजचा संघर्ष महिलांच्या वाट्याला येत असून अश्या परिस्थितीत प्रशासनाच्या विरोधात अखेर महिलांनी घागर मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध नोंदविला. घागर मोर्चाची सुरुवात स्थानिक दर्यापूर येथिल बाबासाहेब आंबेडकर पार्क पासून करण्यात आली.
रिपाई(गवई गट) तालुका अध्यक्ष अनिल गवई यांचे उपस्थितीत कान्होली येथिल सरपंच सविता सज्जन चक्रे, उपसरपंच आनंद वानखडे व ग्रामपंचायत सदस्य तथा महिला यांच्या उपस्थितीत घागर मोर्चाला सुरुवात केली.
कान्होली गावात जलजिवन मिशनअंतर्गत नविन पाण्याची टाकी बांधण्यात आली मात्र सोनगाव झोन पासून शेवटचे गाव असलेले कान्होली येथे पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. तसेच गावात 2010 पासून सतत पाणीटंचाई भासत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पाण्याची टाकी आहे पण त्यामध्ये थेंब सुद्धा नाही या टाकीला कोकर्डा वरून पाईप लाईन जोडणी केली तरच या टाकीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी येऊन गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल परंतु प्रशासन याचे गांभीर्य घेत नसून पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललेला आहे.
कान्होली गाव आज मात्र बरेच दिवसापासून तहानलेलेच आहे. पण सत्ताधारी आणि प्रशासन मात्र सत्तेच्या नशेत गाढ झोपेत आहे. ग्रामिण भागात पाणी हा मूलभूत हक्क असताना कान्होली येथिल महिला,वृद्ध, लहान मुले रोज दूरवर पायपीट करून पाणी आणत आहेत. एक हंडा भर पाण्यासाठी होणारी रोजची मांडणे अपमान सहन करणे हे कान्होली करांचे ठरले आहे. मात्र अधिकारी याकडे गांभीर्याने पाहतच नाहीत.
लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीत विकासाच्या गप्पा मारतात पण आज गाव तहानलेले असताना ते कुठे गायब आहेत?पाणी टंचाई सारख्या गंभीर प्रश्नावर मौन बाळगणे हीच का त्यांची लोकसेवा?त्यांच्या फक्त मतांचे आकडे पाहिजे आहेत असा सवालही ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला.महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांनी तात्काळ कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची ठोस उपाययोजना केली नाही तर 16 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याबाबत गावातील महिलांनी यावेळी सांगितले हा संताप केवळ पाण्यासाठी नाही तर वर्षानुवर्ष सहन केलेल्या प्रशासनाच्या बेपरवाही विरुद्ध आहे.
या घागर मटका आंदोलनात सरपंच सविता चक्रे उपसरपंच समाधान वानखडे ग्रामपंचायत सदस्य पद्माकर राऊत, तृप्ती राऊत, अंजली राऊत, प्रियंका वानखडे अनुप काळे, तसेच गावातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.



