दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयाला उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात विद्यालयातील उपशिक्षिका उज्वला कडलासकर यांनाही शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री ज्ञानेश्वर विद्यालय ही केवळ भौतिक सुविधा देणारी शाळा नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवते. येथे गणित, विज्ञान, संगणक प्रयोगशाळा, कलादालन, क्रीडा दालन, भव्य क्रीडांगण आणि माऊली बाग यांसह आधुनिक इमारती आहेत.
तसेच, विद्यार्थ्यांना दहावी, बारावी अभ्यास, स्कॉलरशिप, एन. एम. एम. एस., ओलंपियाड, विविध विषयांच्या प्रज्ञाशोध परीक्षा यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन, मासिक चाचण्या, असाइनमेंट, आकर्षक वर्ग सजावट, विद्यार्थी अपघात फंड व आनंददायी शनिवारच्या माध्यमातून कृतीयुक्त अध्यापनाची संधी दिली जाते.
क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर मिळविलेल्या यशाची दखल घेत शिक्षक सेनेने विद्यालयाला हा पुरस्कार प्रदान केला.
हा सन्मान संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, नारायण पिंगळे, उज्वला कडलासकर, सोनाली आवारी यांनी स्विकारला. संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर व सचिव अजित वडगावकर यांनी प्रशासन, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले.



